Latest

भविष्यात यंत्रमानवांचा वापर वाढणार; रोबोटिक्स क्षेत्रात कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज

अमृता चौगुले

गणेश खळदकर

पुणे : 'सध्या मानवी जीवाला धोका असणार्‍या कामांमध्ये रोबोट्सचा (यंत्रमानव) वापर होत आहे. मात्र, भविष्यात सर्वच क्षेत्रात यंत्रमानवांचा वापर वाढणार आहे. त्यामुळे रोबोटिक्स क्षेत्रात कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज भासणार आहे, असे मत रोबोटिक्स क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, रोबोट्चा उपयोग औद्योगिक कंपन्या, वैद्यकीय, लष्करी, कृषी, हॉटेल, मार्केटिंग अशा विविध क्षेत्रातील विविध कामांमध्ये होत आहे. यात प्रामुख्याने आता वैद्यकीय क्षेत्रात फक्त शस्त्रक्रियेपुरता मर्यादित विचार न करता, दवाखान्यातील दैनंदिन कामे करतानासुद्धा यंत्रमानव मदत करू शकतो. माणसासारखी दिसणारी मशीन असा रोबोट्सचा असलेला चेहरा आता बदलत चालला आहे. हेरगिरी, टेहळणी आणि हल्ला, आक्रमण यापासून सुरू झालेला ड्रोनचा प्रवास, संरक्षण क्षेत्रात भूसुरुंगाचा शोध लावण्यासाठी प्रभावीपणे केला जात आहे.

त्याचबरोबर पिकांची पाहणी व त्यावरील रोगांची माहिती गोळा करण्याकरिता ड्रोन उपयोगात आणले जात आहेत. संकटांमध्ये शोध आणि बचाव कार्य, विजेच्या तारांची पाहणी, अनधिकृत बांधकामांचे नियंत्रण, जमिनींचे सर्वेक्षण, भूस्खलन मोजणी, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासाच्या मार्गाची टेहळणी या नवीन क्षेत्रांमध्ये रोबोटिक्सचा वापर वाढत चालला आहे. यंत्र मानवांमध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी वास्तव आणि मिश्रित वास्तव याचा वापर सुरू झाला आहे. जेणेकरून रोबोट मानवाप्रमाणेच निर्णय घेऊ शकणार आहेत. त्यामुळे येत्या काळात जवळपास सर्वच क्षेत्रात यंत्रमानव दिसणार असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणार्‍या कुशल मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्यासाठीचे ज्ञान घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यायला हवे.

रोबोटिक्स म्हणजे काय?

'रोबोटिक्स'मध्ये तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि यंत्रमानव संबंधित अनुप्रयोगांचा समावेश आहे. रोबोट असे एक मशिन आहे, जे संगणकाच्या नियंत्रणाखाली विविध कार्य करते, ज्यासाठी रोबोट मशिनची रचना केली गेली आहे. सध्या भारतात रोबोट डिझाइन करण्यासाठी, विकसनशील आणि प्रोग्रामिंगसाठी पात्र, अनुभवी व्यावसायिकांची बरीच मागणी आहे. रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रात आता अभियांत्रिकीची पदवी आणि पदव्युत्तर पदवी उपलब्ध आहे.

रोबोट, ऑटोमेशन, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे येत्या काळात सर्वच औद्योगिक क्षेत्रात या प्रणालींचा उपयोग होणार आहे. यंत्र अभियांत्रिकी, यंत्रमानव अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी आणि अणुविद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना येत्या काळात अनेक संधी उपलब्ध होतील.
– प्रा. डॉ. गणेश काकांडीकर, प्राध्यापक, यंत्र अभियांत्रिकी, एमआयटी विद्यापीठ, पुणे

जिथे क्लिष्ट कार्य आणि मानवाच्या जीविताला धोका संभवतो, तिथे यंत्रमानवाचा उपयोग अनिवार्य होईल. अगदी मलनिस्सारण प्रणाली साफ करण्यापासून ते सरंक्षण क्षेत्रापर्यंत ते विस्तारत आहे. वैद्यकीय क्षेत्रात यंत्रमानवांचा उपयोग वाढत आहे.
– प्रा. डॉ. विलास नांदेडकर, निवृत्त विभागप्रमुख, श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT