पुणे : धमक असल्यास साखर कारखाने चालवून दाखवा : अजित पवार | पुढारी

पुणे : धमक असल्यास साखर कारखाने चालवून दाखवा : अजित पवार

बारामती (पुणे), पुढारी वृत्तसेवा : बारामती शेजारी सातारा जिल्ह्यात खंडाळा, किसनवीर, प्रतापगड हे साखर कारखाने बंद पडले आहेत. तर विदर्भ, मराठवाड्यात अनेक कारखाने बंद आहेत. १२ ते १३ कारखाने चालविण्यासाठी द्यायचे आहेत. कोणामध्‍ये धमक असेल तर त्यांनी ते घेवून चालवून दाखवावेत, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरहाळे बुद्रूक येथे बोलताना म्‍हणाले.

या वेळी अजित पवार म्हणाले, साखर कारखाने चालविण्यासाठी घेतले की आरोप-प्रत्यारोप हाेतात. आरोप करणे सोपे आहे; परंतु कारखाना चालवायला घेवून तो नीट-नीटका चालविणे खूप जिकिरीचे असते. सध्या राज्यातील १२ ते १३ कारखाने चालवायला द्यायचे आहेत. आपल्यापैकी कोणात धमक असेल तर नियमांनुसार त्यांनी जरूर ते चालविण्यासाठी घ्यावेत.  काही लोक यावरून आरोप करतात; परंतु जेव्हा स्वतः कारखाना चालवण्याची वेळ येते तेव्हा मागे सरकतात, हा अनुभव मला आहे.  (Ajit Pawar)

कुठून दुर्बुद्धी सुचली अन कारखाने चालवायला घेतले : गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा जाहीर भाषणामधून   मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि साखर कारखाने चालवायला घेतले, असे वक्तव्य अनेकदा केले आहे. कारखाने चालवायला घेवून पश्चाताप होत असल्याचे गडकरी म्हणाले आहेत. त्यावरून कारखाने चालवायला घेणे किती जिकिरीचे काम आहे याचा अंदाज येतोच, असेही पवार म्हणाले.

कार्यक्षेत्र बदलायचे

निरा खोर्‍यातील सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती कारखान्याचे कार्यक्षेत्र बदलले जात आहे. सोमेश्वरची काही गावे माळेगाव कारखान्याकडे समाविष्ट केली जात आहेत. छत्रपती कारखान्यानेही बारामती तालुक्यातील वाहतूकीचा जवळची ठरतील अशा गावातील शेतक-यांना त्यांच्याकडे सभासद करून घ्यावे. या तिन्ही कारखान्यांच्या अध्यक्षांनी हा विषय लवकर मार्गी लावावा, असेही त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा  

Back to top button