पुणे; पुढारी वृत्तसेवा
देशात जे शेतकरी सेंद्रिय शेती करत असतील, अशा शेतकऱ्यांना जागतिक दर्जाची बाजारपेठ उपलब्ध करून देत, त्यांचा माल आता सरकारच्यावतीने देश-विदेशात विकण्यास मदत करेल, अशी घोषणा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी रविवारी पुण्यात केली. पुण्यातील वैकुंठभाई मेहता या राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत संस्थेत शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत २७ वा पदवीदान समारंभावेळी ते बोलत होते.
यावेळी शहा म्हणाले की, मोदींच्या काळातच देशातील पहिले सहकार मंत्रालय झाले. त्या माध्यमातून आता देशात सेंद्रीय शेती करणार्या शेतकऱ्यांची जबाबदारी सरकार घेणार आहे. त्यांच्या मालाचे विपणन व विक्री देश-विदेशात सरकार करून देईल.
75 वर्षात आपल्या देशात 22 सरकारे झाली. मात्र आजवर कोणीही असे सहकार मंत्रालय स्थापन केले नाही. मोदी यांनी हे काम प्रथम करून दाखवले. माझे सौभाग्य आहे की, मी या देशाचा पहिला सहकार मंत्री झालो. सहकार क्षेत्राची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे हे लक्षात घेता सहकार क्षेत्र अधिक बळकट केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
'अमुल'च्या धर्तीवर लिज्जत पापड ही सहकारी संस्थाही अतिशय सुरेख मॉडेल म्हणून देशात आहे. 130 कोटी लोकांचा विकास करायचा असेल तर सहकार क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळे सहकार क्षेत्रासाठी आता स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा सरकारचा विचार असून देशात सहकार विद्यापीठांचे जाळे विणले जाईल, असेही शहा यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा