Latest

Thackeray vs Shelar :…आणि स्वतःच मुख्यमंत्री होऊन दाखवलं; शेलारांचा ठाकरेंवर निशाणा

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे गटाने समाजवादी जनता परिवाराशी युती केली आहे, अशी घाेषणा शिवसेना ठाकरे गटाचे  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवार (दि.१६) केली. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये समाजवादी जनता परिवार आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांमध्ये संयुक्त बैठक पार पडली. समाजवादी परिवारातील विविध संघटनेतील सदस्यांनी ह्यावेळी ठाकरे गटाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती. एक नवीन सुरुवात करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी स्‍पष्‍ट केले. यानंतर भाजपा नेते आशिष शेलार  यांनी आपल्या 'X' अकाउंटवर पोस्ट करत ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Thackeray vs Shelar)

बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं…?

समाजवादी जनता परिवाराशी केलेल्या युतीनंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाउंटवर,"हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं…? असा सवाल करत आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काय-काय करुन दाखवलं हे उपरोधिक भाषेत पोस्टमध्ये नमुद केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, " शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो सांगितले आणि स्वतःच मुख्यमंत्री होऊन दाखवलं, श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार यांच्या सोबत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून दाखवले, राम मंदिरावर टीका करुन दाखवली, हिंदू सणांवर बंदी आणून दाखवली, छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागून दाखवले, छत्रपतींच्या वाघ नखांबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करुन दाखवले, वंदनीय बाळासाहेबांनी आयुष्यभर ठाकरी फटकारे मारले त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, लालू प्रसाद, स्टॅलिन पासून आता समाजवाद्यांसोबत सुपुत्राने जाऊन दाखवलं", "गर्व से कहो हम हिंदू हैं" म्हणणारी शिवसेना आता "गर्व से कहों हम समाजवादी हैं" म्हणू लागली..! भविष्यात कदाचित "गर्व से कहो हम MIM हैं" सुध्दा म्हणू लागतील!!

Thackeray vs Shelar : आपली लढाई विचारांशी, व्यक्तींशी नाही : उद्धव ठाकरे

आपल्याकडे सत्ता नसतानाही जे लोक आपल्या सोबत येतात, त्यांच्यासोबतची मैत्री चिरकाल टिकते. मी समाजवादी पक्षासोबत युती करत आहे. यामध्ये तुमच्या पोटात दुखण्यासारखे काय आहे? तुम्ही गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करु शकता. तर मग मी समाजवादी पक्षासोबत मैत्री केली तर अडचण काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. २१ पक्ष माझ्यासोबत आले आहेत, हे माझे भाग्य आहे. आपली लढाई विचारांशी आहे, व्यक्तींशी नाही. त्यामुळे आपल्याला विचारांचा लढा पुढे घेवून जायचे आहे. महाराष्ट्राला लढायचे कसे? हे शिकवण्याची गरज नाही. आजही लोक मला लाडके माजी मुख्यमंत्री म्हणतात, कुटुंबप्रमुख मानतात, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT