पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे गटाने समाजवादी जनता परिवाराशी युती केली आहे, अशी घाेषणा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि.१५) केली. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये समाजवादी जनता परिवार आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांमध्ये संयुक्त बैठक पार पडली. समाजवादी परिवारातील विविध संघटनेतील सदस्यांनी ह्यावेळी ठाकरे गटाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती. एक नवीन सुरुवात करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. (Thackeray Group)
आपल्याकडे सत्ता नसतानाही जे लोक आपल्या सोबत येतात, त्यांच्यासोबतची मैत्री चिरकाल टिकते. मी समाजवादी पक्षासोबत युती करत आहे. यामध्ये तुमच्या पोटात दुखण्यासारखे काय आहे? तुम्ही गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करु शकता. तर मग मी समाजवादी पक्षासोबत मैत्री केली तर अडचण काय? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. (Thackeray Group)
२१ पक्ष माझ्यासोबत आले आहेत, हे माझे भाग्य आहे. आपली लढाई विचारांशी आहे, व्यक्तींशी नाही. त्यामुळे आपल्याला विचारांचा लढा पुढे घेवून जायचे आहे. महाराष्ट्राला लढायचे कसे? हे शिकवण्याची गरज नाही. आजही लोक मला लाडके माजी मुख्यमंत्री म्हणतात, कुटुंबप्रमुख मानतात, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.