पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमध्ये बँकिंग क्षेत्रात संकटात असल्याचे चित्र आहे. येथील हेनान प्रांतात बँकेतील ठेवी काढण्यासाठी जमलेल्या नागरिकांना रोखण्यासाठी रस्त्यावर रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. चीनने अशा प्रकारे रणगाडे तैनात केल्याने अनेकांची याची तुलना १९८९च्या तियानमेन चौकातील आंदाेलनाशी केली आहे. चीनने याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. तर काही बँकानी ठेवीदारांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
हेनान आणि अनहै या प्रांतातील चार बँकांनी त्यांच्या ठेवीदारांची खाती गोठवली. त्यामुळे ठेवीदारांना खात्यातील पैसे काढता येत नाहीत. या बँकात काही गैरप्रकार घडल्याचे सांगितले जाते. त्यानंतर संतापलेल्या ठेवीदरांनी आंदोलन सुरू केले. यातील सर्वांत मोठे आंदोलन १० जुलैला झाले. त्यानंतर सरकारने आंदोलकांवर कारवाईही सुरू केली होती.
चायना बँकिंग आणि इन्शुरन्स नियंत्रक आयुक्तालयाने ठेवीदारांना मुद्दल परत देण्यासाठी व्यवस्था केली असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे या बँकाच्या समोर चीनने रणगाडेही तैनात केले आहेत. ठेवीदारांना आंदोलन करण्यापासून परावृत्त करण्यासाठी हे रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. याघटनेच्या व्हिडीओ क्लिप साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. बँक ग्राहकांना हुसकावण्यासाठी चक्क रणगाडे तैनात करण्यात आल्याने अनेकांनी या आंदाेलनाची तुलना १९८९च्या तियानमेन चौकातील आंदाेलनाशी केली आहे.
हेही वाचा :