Monkeypox | चिंताजनक! अमेरिकेत पहिल्यांदाच मुलांमध्ये आढळला मंकीपॉक्सचा संसर्ग, ६० देशांतील १४ हजार जणांना लागण | पुढारी

Monkeypox | चिंताजनक! अमेरिकेत पहिल्यांदाच मुलांमध्ये आढळला मंकीपॉक्सचा संसर्ग, ६० देशांतील १४ हजार जणांना लागण

वॉशिंग्टन; पुढारी ऑनलाईन : अमेरिकेत प्रथमच लहान मुलांना मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. अमेरिकेत दोन मुलांना मंकीपॉक्सचा संसर्ग झाला आहे. कॅलिफोर्नियातील एका मुलाला आणि नवजात अर्भकाला मंकीपॉक्सचा संसर्ग झाला आहे. पण दोन्ही मुले अमेरिकेतील नागरिक नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दोन्ही प्रकरणाचा एकमेकाशी संबंध नाही. त्यांना घरातच संक्रमण झाले असण्याची शक्यता सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रिव्हेंशन (CDC) ने एका निवेदनातून व्यक्त केली आहे. दोन्ही मुलांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
मंकीपॉक्सची लक्षणे फ्लू सारखी असतात. त्वचेवर पुरळ उठतात. अलीकडच्या काही प्रकरणांत समलिंगी संबंधातून पुरुषांमध्ये मंकीपॉक्सचा फैलाव अधिक होत असल्याचे आढळून आले आहे.

पश्चिम आणि मध्य आफ्रिका देशांच्या बाहेर याचा उद्रेक अधिक आहे. हा रोग प्रामुख्याने जवळच्या संपर्कातून पसरतो. या वर्षी आतापर्यंत ६० हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सची १४ हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर आफ्रिकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

एका कॉन्फरन्स कॉलवर बोलताना, CDC च्या पॅथॉलॉजी विभागाचे उपसंचालक डॉ. जेनिफर मॅकक्विस्टन यांनी सांगितले की लहान मुलांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली आहेत. ही गंभीर बाब आहे. पण आजपर्यंत या विषाणूचा संसर्ग समलिंगी, उभयलिंगी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांच्या समुदायाच्या बाहेर पसरला असल्याचे आढळून आलेले नाही.

अमेरिकेत पुष्टी झालेल्या २,९९१ मंकीपॉक्स (Monkeypox) रुग्णांपैकी ९९ टक्के रुग्ण हे समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष आहेत. पण काही महिला आणि ट्रान्सजेंडर यांनाही संसर्ग झाला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. व्हाईट हाऊसचे कोविड-१९ रिस्पॉन्स कॉर्डिनेटर डॉ. आशिष झा यांनी सांगितले की, सरकारने मंकीपॉक्स लसीचे ३ लाख डोस वितरित केले आहेत आणि डेन्मार्कमधून ७ लाख ८६ हजार आणखी डोस पाठवण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. दरम्यान, आफ्रिकेत सुरुवातीला झालेल्या संसर्गात मृत्यूचे प्रमाण सध्याच्या स्ट्रेनच्या जवळपास १ टक्के आहे.

मंकीपॉक्स विषाणूची संसर्गक्षमता खूपच कमी आहे. पण कोरोनाच्या तुलनेत मंकीपॉक्स मुलांसाठी जीवघेणा ठरू शकतो, असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तज्ज्ञांनी याआधी म्हटले होते.

Back to top button