कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा गत हंगामातील गाळप झालेल्या उसाला दसऱ्यापूर्वी आणखी ४०० रुपये द्यावेत. या वर्षीच्या हंगामाचा ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करायची नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. कुरुंदवाड येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कर्नाटक राज्यातील काडापूर (ता.चिकोडी) येथून शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील गुऱ्हाळ घराकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर अडवला.
दरम्यान ट्रॅक्टरमध्ये 20 ते 25 टन ऊस भरलेला होता. ट्रॅक्टर अडवून पाडला तर शेतकरी बांधवांचा नुकसान होणार आहे. म्हणून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदर ट्रॅक्टर चालकाला 7 तारखेच्या ऊस परिषदेत निर्णय झाल्याशिवाय परत ऊस तोड करू नका असे सांगून ट्रॅक्टर सोडून दिला.
कारखानदारांनी गत हंगामातील उसाला आणखी ४०० रुपये द्यावेत, या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्यावर जाऊन संघटनेने ढोल बजाव आंदोलन केले आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर, कारखान्यातून बाहेर पडणारी साखर, इतर उत्पादीत पदार्थ रोखण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
मात्र, कारखानदारांनी ती मागणी बेदखल केली. त्यामुळे स्वाभिमानी संघटना आता आक्रमक झाली आहे. आज सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील काडापूर येथून नांदणी येथील गुऱ्हाळघरात उस नेत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अविनाश गुदले, वर्धमान भबीरे, अमोल चौगुले, सुरेश भबीरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर अडवून चालकावर प्रश्नांची सरबत्ती केली. ऊस परिषद झाल्याशिवाय ऊसतोड करून ऊस वाहतूक करू नये अशी समज देऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ट्रॅक्टर सोडून देण्यात आला.
त्यामुळे गुऱ्हाळघराची चिमणी देखील आता थंडावली आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर, आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
हेही वाचा :