Latest

Closing Bell | बाजाराची सुस्त चाल! FMCG, ‘आयटी’ला फटका, जाणून घ्या आजचे मार्केट

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : परकीय गुंतवणूकदारांकडून होत असलेली सतत विक्री आणि जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांदरम्यान आज गुरुवारी (दि.९) भारतीय बाजारात घसरण झाली. सुरुवातीला सपाट झालेला सेन्सेक्स १४३ अंकांनी घसरून ६४,८३२ वर बंद झाला. तर निफ्टी ४८ अंकांच्या घसरणीसह १९,३९५ वर स्थिरावला.

क्षेत्रीय पातळीवर संमिश्र ट्रेंड दिसून आला. रियल्टी आणि ऑटो निर्देशांकात प्रत्येकी १ टक्‍क्‍यांनी वाढ झाली. तर ऑईल आणि गॅस, FMCG, आयटी निर्देशांक ०.५ टक्‍क्‍यांनी घसरला. बीएसई मिडकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.२५ टक्क्यांनी घसरला. (Stock Market Closing Bell)

संबंधित बातम्या 

'हे' शेअर्स घसरले

सेन्सेक्स आज ६५,०२५ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६४,७६८ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर हिंदुस्तान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, इन्फोसिस, रिलायन्स, टीसीएस हे शेअर्स १ ते १.५० टक्क्यांदरम्यान घसरले. बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, एशियन पेंट्स हे शेअर्सही घसरले. तर एम अँड एमचा शेअर टॉप गेनर ठरला. हा शेअर ४ टक्क्यांनी वाढून १,५५० रुपयांवर पोहोचला. पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, एलटी, मारुती, एनटीपीसी, टाटा स्टील हे शेअर्सही आज वधारले होते.

निफ्टीवर अदानी एंटरप्रायझेस, एचयूएल, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, अदानी पोर्ट्स आणि टेक महिंद्रा हे टॉप लूजर्स ठरले. तर एम अँड एम, अपोलो हॉस्पिटल्स, कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन हे वाढले होते.

Mamaearth शेअर्स IPO इश्यू किमतीच्या खाली घसरला

ममाअर्थ (Mamaearth) ची पेरेंट कंपनी Honasa Consumer चे शेअर्स आज गुरुवारी एनएसईवर जवळपास ५ टक्क्यांनी घसरून ३०६.६५ रुपयांवर आले. मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी लिस्टिंग झाल्यापासून या शेअर्सची घसरण सुरू आहे. सध्या हा शेअर ३२४ रुपयांच्या इनिशिएल पब्लिक ऑफर म्हणजेच आयपीओ (IPO) इश्यू किमतीच्या खाली आला आहे. सुरुवातीला ५ टक्के आणि त्यानंतर दुपारच्या व्यवहारात हा शेअर ४ टक्क्यांच्या घसरणीसह ३०९ रुपयांवर होता. (Honasa Consumer Share Price) हा शेअर एनएसईवर (NSE) २ टक्क्यांच्या प्रीमियमवर ३३० रुपयांवर लिस्ट झाला होता आणि इंट्राडे आधारावर या शेअरचा उच्चांक ३४०.४५ रुपये आहे.

जागतिक बाजारात संमिश्र वातावरण

आशियाई बाजारात आज संमिश्र वातावरण राहिले. सेऊल, टोकियो आणि शांघाय येथील निर्देशांक यांनी सकारात्मक पातळीवर व्यवहार केला. तर हाँगकाँग येथील हँगसेंग निर्देशांक घसरला. बुधवारी अमेरिकेतील बाजारात संमिश्र वातावरण राहिले होते.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा कायम आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे. एक्सचेंज डेटानुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) बुधवारी ८४.५५ कोटी रुपये किमतीच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ५२४.४७ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ८० डॉलरच्या खाली आले आहे. (Stock Market Closing Bell)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT