एसटी 
Latest

एसटी चालकाची बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या; कर्जबाजारीपणाला कंटाळून कृत्‍य

नंदू लटके

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा ; कर्जबाजारीपणाला कंटाळून एसटी चालकाने रिकाम्या बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना नगर जिल्‍ह्यातील संगमनेर शहरातील बस स्थानकात आज सकाळी उघडकीस आली आहे. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्‍महत्‍या केलेल्‍या एसटी चालकाचे नाव आहे. त्‍यांनी आत्‍महत्‍येपूर्वी लिहिलेल्‍या चिठ्ठीत आत्‍महत्‍येचे कारण स्‍पष्‍ट झाले आहे.   त्यामध्ये कोणाचेही नाव अगर कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचेही म्‍हटलं आहे.

मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. संगमनेर स्थानकात पाथर्डी-नशिक (एमएच १४ बीटी ४८८७) ही बस उभी होती.

त्यामध्ये तेलोरे यांचा गळफास लावून घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

बसचे वाहक पोपट साहेबा जावळे (पाथर्डी डेपो) यांनी पोलिसांना माहिती कळविली.

पहाटे पाचच्या सुमारास तेलोरे आपल्या अन्य सहकाऱ्यांसह कामावर जाण्यासाठी तयार झाले.

डेपोतून बाहेर पडताना ते पुढे निघाले. मी पुढे जातो, तुम्ही पाठीमागून या, असे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले.

थोड्यावेळाने वाहक जावळे बसमध्ये आले. त्यावेळी चालक तेलोरे यांचा मृतदेह बसमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

प्रवाशांना उभे राहताना पकडण्यासाठी बसच्या छताला जो बार लावलेला असतो, त्याला सुती दोरीच्या सहायाने तेलोरे यांनी गळफास लावून घेतल्याचे आढळून आले.

याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

साडेसहा लाख रुपये होते कर्ज

घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी मिळाली आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख रुपयांचे कर्ज असल्याचा व त्याला कंटाळल्याचा उल्लेख आहे. मात्र, यामध्ये कोणालाही जबाबदार धरणारा नमोल्लेख पोलिसांना आढळून आला नाही. कुटुंबाकडे चौकशी झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक फौजदार शिवाजी फटांगरे हे तपास करत आहेत.

हेही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT