दिल्ली कॅपिटल्स संघाने महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 च्या लिलावापूर्वी पाच महत्त्वाच्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात कायम ठेवले आहे. सलग तीन हंगामांमध्ये संघाचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या कर्णधार मेग लॅनिंगला मात्र दिल्लीने यंदा रिलीज करत सर्वांना धक्का दिला आहे. याउलट, युवा प्रतिभावान फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स आणि शेफाली वर्मा यांच्यावर संघाने पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे.
WPL 2025 मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने आगामी लिलावापूर्वी पाच खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत शानदार शतकी खेळी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्ससाठी संघाने तब्बल 2.20 कोटी रुपये खर्च केले आहेत.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर धमाकेदार प्रदर्शन करणाऱ्या शेफाली वर्माला देखील संघात कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संघाला सलग तीनवेळा अंतिम फेरीपर्यंत पोहोचवणाऱ्या कर्णधार मेग लॅनिंगला मुक्त करण्याच्या निर्णयामुळे क्रीडा वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
दिल्ली कॅपिटल्सने जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, ॲनाबेल सदरलँड, मारिजाने कॅप आणि निक्की प्रसाद या पाच खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला विश्वचषक स्पर्धेत फलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जेमिमा रॉड्रिग्सला दिल्लीने 2.20 कोटी रुपये खर्चून रिटेन केले आहे. तर अंतिम सामन्यात 87 धावांची धडाकेबाज खेळी करत 2 बळी घेणाऱ्या शेफाली वर्मावरही दिल्लीने 2.20 कोटी रुपये खर्च केले आहेत. शेफालीने गेल्या हंगामातील 9 सामन्यांमध्ये 304 धावा केल्या होत्या.
विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून प्रभावी खेळ दाखवणाऱ्या सदरलँडला देखील दिल्लीने 2.20 कोटी रुपये दिले आहेत. द. आफ्रिकेच्या मारिजाने कॅपला सुद्धा डीसीने 2.20 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. अनकॅप्ड खेळाडू निक्की प्रसादला 50 लाख रुपयांमध्ये संघात कायम ठेवण्यात आले आहे.
या खेळाडूंना रिटेन केल्यानंतर दिल्लीच्या तिजोरीत (पर्स) आता 5.70 कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. या रकमेचा वापर संघ 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लिलावात करणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सने WPL 2025 मध्ये अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला होता. तथापि, अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून त्यांना 8 धावांनी अत्यंत रोमांचक पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 7 गडी गमावून 149 धावा फलकावर लावल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 9 गडी गमावून केवळ 141 धावांपर्यंतच मजल मारू शकला. दिल्लीने 2024 आणि 2023 मध्येही अंतिम फेरी गाठली होती, मात्र त्यांना अद्याप एकदाही विजेतेपदावर शिक्कामोर्तब करता आलेले नाही.