

Mohammed Shami Takes A Dig At Gambhir : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतीमधून सावरलेल्या ऋषभ पंतने पुनरागमन केलेआहे. त्याच्याकडे पुन्हा एकदा उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. आकाश दीपलाही पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पुन्हा एकदा दुर्लक्षित करण्यात आले आहे. रणजी ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी करूनही त्याची निवड न झाल्याने चाहते तीव्र नापसंती व्यक्त करत आहेत. आता शमीने युट्यूब व्हिडिओमध्ये चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकरांवर निशाणा साधला आहे.
मोहम्मद शमीने युट्यूब व्हिडिओमध्ये चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. चाहत्यांनी वेगवान गोलंदाजाला प्रतिकूल परिस्थितींना तोंड देण्याबद्दल आणि त्यांच्या प्रतिभेचा सर्वोत्तम वापर कसा करायचा याबाबत विचारणा केली होती यावर शमीने कठोर परिश्रमाला पर्याय नसल्याचे शमीने सांगितले. तसेच "जर तुमच्याकडे प्रतिभा असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला कठोर परिश्रम करत राहावे लागतील, सराव करत राहावे लागेल आणि तुमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर तुम्ही निष्ठावान, मेहनती आणि चांगले कामगिरी करणारे असाल तर तुमचे शत्रू किंवा ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही ते लोक तुम्हाला जास्त काळ थांबवू शकत नाहीत. प्रतिभा नेहमीच विकली जाते," असे सांगत त्याने अप्रत्यक्षपणे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकरांवर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला.
आयपीएलनंतर शमीच्या तंदुरुस्तीबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत, परंतु अलिकडच्या काही महिन्यांत शमीने आपल्या कामगिरीने टीकाकारांना उत्तर दिले आहे. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने ५ डावात १५ बळी घेतले आहेत, ज्यामध्ये पाच बळींचा समावेश आहे.
शमीला संघातून वगळल्यानंतर इंडिया टूडेशी बोलताना शमीचे प्रशिक्षक मोहम्मद बद्रुद्दीन म्हणाले की, " ते त्याला दुर्लक्षित करत आहेत, हे स्पष्ट आहे. मला दुसरे कोणतेही कारण समजत नाही. जेव्हा एखादा खेळाडू कसोटी सामने खेळत असतो, दोन सामन्यात १५ बळी घेतो तेव्हा तो अनफिट नसतो; मग तो कुठूनही अनफिट दिसत नाही."
३६ वर्षीय शमी अजूनही भारतीय संघात स्थान मिळवण्याची जिद्द आहे. तो रणजी ट्रॉफीमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता; पण पुन्हा एकदा त्याला दुर्लक्षित करण्यात आले आहे. आता शमी त्याच्या कामगिरीत सातत्य राखू शकला, तर त्याच्याच शब्दात, त्याला कोणीही रोखू शकत नाही, हे स्पष्ट होणार आहे.