

मार्क चॅपमनने केलेल्या २८ चेंडूंतील ७८ धावांच्या शानदार खेळीमुळे न्यूझीलंडने गुरुवारी (दि. ६) ऑकलंड येथे झालेल्या दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा अवघ्या तीन धावांनी पराभव केला. या विजयासह यजमान संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
चॅपमनने आपल्या धडाकेबाज खेळीत सहा चौकार आणि सात उत्तुंग षटकार लगावले. त्याने केवळ १९ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने नवव्या ते सोळाव्या षटकांदरम्यान १०० धावांची भर घातली आणि निर्धारित ५ गडी गमावून २०७ धावांचा विशाल स्कोर उभा केला.
चॅपमनव्यतिरिक्त न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने १४ चेंडूंमध्ये नाबाद २८ धावा आणि मिचेल सँटनरने अवघ्या आठ चेंडूंमध्ये नाबाद १८ धावांचे मोलाचे योगदान दिले. तसेच, टिम रॉबिन्सनने सलामीला येऊन ३९ धावांची खेळी केली.
वेस्ट इंडिजच्या रोस्टन चेसने ४ षटकांत ३३ धावा देत सर्वाधिक २ बळी घेतले. रोमारिओ शेफल्ड, जेसन होल्डर आणि मॅथ्यू फोर्ड यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
२०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात निराशाजनक झाली आणि १३ षटकांनंतर त्यांची अवस्था ६ गड्यांच्या मोबदल्यात केवळ ९४ धावा अशी बिकट झाली होती.
मात्र, रोवमन पॉवेल (१६ चेंडूंमध्ये ४५ धावा), रोमारिओ शेफर्ड (१६ चेंडूंमध्ये ३४ धावा) आणि मॅथ्यू फोर्ड (१३ चेंडूंमध्ये नाबाद २९ धावा) यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या बळावर वेस्ट इंडिजने जोरदार पुनरागमन केले. अखेरीस, त्यांची टीम ८ गडी गमावून २०४ धावांपर्यंतच मजल मारू शकली आणि यजमान न्यूझीलंडने हा रोमांचक सामना अवघ्या ३ धावांनी जिंकला.
किवी संघाकडून मिचेल सँटनर आणि ईश सोढी यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. काईल जेमिसन आणि जेकब डफीला प्रत्येकी एक-एक यश मिळाले.
पहिला टी२० : वेस्ट इंडिजने ७ धावांनी विजय मिळवला होता. (वेस्ट इंडिज: २० षटकांत १६४/७, न्यूझीलंड: २० षटकांत १५७/९)
दुसरा टी२० सामना न्यूझीलंडने जिंकल्यामुळे आता ही मालिका निर्णायक टप्प्यावर आली आहे.
या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक टी२० सामना १० नोव्हेंबरला खेळला जाईल.