दिल्ली : बहुप्रतीक्षित महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) लिलावात भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने अपेक्षेप्रमाणे मोठी रक्कम मिळवली. यूपी वॉरियर्सने ‘राईट टू मॅच’ कार्डचा वापर करून दीप्तीला 3.20 कोटी रुपयांच्या करारासह आपल्या संघात कायम ठेवले. गतवर्षी संयुक्तरीत्या सर्वाधिक बळी घेणारी न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू ॲमेलिया केर हिला 3 कोटी रुपयांची बोली लावत मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात सामील केले.
आठ खेळाडूंच्या या प्रतिष्ठित सेटमध्ये अनुभवी ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग आणि न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन यांचाही समावेश होता आणि त्यांनाही भरघोस बोली मिळाली. सोफी डिव्हाईन हिला गुजरात जायंटस्ने 2 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.
दिल्ली कॅपिटल्सला सलग तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचवणाऱ्या मेग लॅनिंग हिला दिल्ली कॅपिटल्ससोबतच्या चुरशीच्या बोली युद्धानंतर यूपी वॉरिअर्सने 1.90 कोटी रुपयांना संघात घेतले. सर्वाधिक 14.5 कोटी रुपयांची रक्कम घेऊन लिलावात उतरलेल्या वॉरिअर्स संघाने या लिलावात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी पुन्हा एकदा आरटीएम कार्डचा वापर करत इंग्लंडची प्रमुख फिरकी गोलंदाज सोफी एक्लेस्टोन हिला 85 लाख रुपयांना संघात परत घेतले.
दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लॉरा वोल्व्हार्ड हिला दिल्ली कॅपिटल्सने 1.10 कोटी रुपयांना करारबद्ध केले. याशिवाय, गुजरात जायंटस्ने भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका सिंग हिला 60 लाख रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार ॲलिसा हिली हिचे नाव सर्वात प्रथम लिलावासाठी पुकारले गेले. मात्र, तिला आश्चर्यकारकरीत्या कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.
महिला प्रीमियर लीगच्या या लिलावात गुजरात जायंटस् न्यूझीलंडची स्टार खेळाडू सोफी डिव्हाईनबरोबरच भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर हिलादेखील आपल्या ताफ्यात घेतले. गुजरातने रेणुकाला 60 लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले.
रेणुका आगामी हंगामात किती तंदुरुस्त आहे, याबाबत साशंकता असली तरी ती नव्या चेंडूवर आश्वासक गोलंदाजी करण्यासाठी सक्षम आहे. 40 लाख रुपयांची मूळ किंमत असलेली रेणुका अखेरीस 60 लाख रुपयांना जायंटस्च्या संघात सामील झाली.
दीप्ती शर्मा : यूपी वॉरिअर्स : 3.2 कोटी
ॲमेलिया केर : मुंबई इंडियन्स : 3 कोटी
सोफी डिव्हाईन : गुजरात जायंटस् : 2 कोटी
मेग लॅनिंग : यूपी वॉरिअर्स : 1.90 कोटी
श्री चरणी : दिल्ली कॅपिटल्स : 1.30 कोटी
लिचफील्ड : यूपी वॉरिअर्स : 1.20 कोटी
चिनेले हेन्री : दिल्ली कॅपिटल्स : 1.20 कोटी
आशा शोभना : यूपी वॉरिअर्स : 1.10 कोटी
लॉरा वोल्व्हार्ड : दिल्ली कॅपिटल्स : 1.10 कोटी
अनसोल्ड खेळाडू
अलिसा हिली, टॅझमिन ब्रिटस्, ग्रेस हॅरिसन, एमी जोन्सन, उमा छेत्री, डार्सी ब्राऊन, लॉरेन चीटल, अमांडा-जेड वेलिंग्टन, सायका इशाक, ॲलाना किंग