नवी मुंबई : सुदैवाची साथ लाभत आलेल्या यजमान भारतीय महिला संघाची गुरुवारी (दि. 30) आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी सेमीफायनल होत आहे. या सामन्यात आठ वर्षांपूर्वी कर्णधार हरमनप्रीत कौरने केलेल्या अविस्मरणीय खेळीची पुनरावृत्ती संघाला अपेक्षित असेल. या लढतीला दुपारी 3 वाजता प्रारंभ होईल.
2017 मध्ये डर्बी-इंग्लंड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य सामन्यात हरमनप्रीतने खेळलेली 115 चेंडूंतील नाबाद 171 धावांची खेळी त्यावेळी सामन्याला कलाटणी देणारी ठरली होती. आजच्या लढतीत ऑस्ट्रेलियाला आणखी एकदा धूळ चारण्यासाठी भारताला अशाच पराक्रमांची आवश्यकता असणार आहे. आजवर 7 वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला नमवणे आव्हानात्मक असले तरी सुदैवाची साथ आणि खेळाडूंना सूर सापडल्यास ते शक्य होऊ शकते, असा होरा आहे. भारताच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असला तरी या महत्त्वाच्या लढतीत एकजिनसी खेळ साकारता आला तर ऑस्ट्रेलियन महिला संघाला पराभवाच्या खिंडीत रोखणे शक्य होऊ शकेल.
फलंदाजीत बहुतांशी अपयशी ठरलेली कर्णधार हरमनप्रीत, आठ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या त्या तुफानी खेळीतून प्रेरणा घेण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. याशिवाय, भारताच्या आशा स्मृती मानधनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतील. तिने 60.83 च्या सरासरीने 1 शतक व 2 अर्धशतकांसह 365 धावा करत लक्षवेधी भूमिका बजावली आहे.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया पुन्हा व्यावसायिक खेळावर भर देत एककलमी वर्चस्व गाजवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. त्यांच्या कौशल्याची किंवा चिकाटीची बरोबरी करू शकेल असा दुसरा संघ क्वचितच आहे. पण शेवटी, त्या दिवशी कोणता संघ सर्वोत्तम खेळतो हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांना मुकल्यानंतर, मंगळवारी ॲलिसा हिली हिच्यासह अन्य ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार सराव केला.
भारतीय महिला : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), उमा छेत्री (यष्टिरक्षक), रिचा घोष (यष्टिरक्षक), हरलीन देओल, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, अमनजोत कौर, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, श्री चरणी, राधा यादव.
ऑस्ट्रेलियन महिला : ॲलिसा हिली (कर्णधार-यष्टिरक्षक), ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी (यष्टिरक्षक), फिबी लिचफिल्ड, जॉर्जिया व्होल, ॲशले गार्डनर, किम गार्थ, हेदर ग्रॅहम, अलाना किंग, सोफी मोलिन्यू, ॲनाबेल सदरलँड, डार्सी ब्राऊन, मेगन शूट, जॉर्जिया वेअरहॅम.
ॲक्यू वेदरच्या रिपोर्टनुसार, सकाळपासूनच पाऊस पडू शकतो. शुक्रवारचा दिवस राखीव असला तरी त्या दिवशीही 80 टक्याहून अधिक पावसाचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत नियमानुसार, गुणतालिकेत सरस टीम पुढील फेरीसाठी पात्र ठरते. साखळी फेरी अखेर भारतीय संघ 7 गुणांसह चौथ्या तर ऑस्ट्रेलियाचा संघ 13 गुणांसह अव्वल स्थानी होता. या स्थितीत, जर दोन्ही दिवशी सामना होऊ शकला नाही, तर ऑस्ट्रेलियाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल आणि भारतीय संघाला न खेळताच स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे.
प्रतीकाची जागा तितक्याच ताकदीने भरून काढण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन कोणती रणनीती आजमावणार, हे आज नाणेफेकीवेळी स्पष्ट होईल. आक्रमक शैलीने प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणू शकणाऱ्या शेफालीला संधी द्यावी, की सहाव्या गोलंदाजाला संघात स्थान देण्यासाठी हरलीन देओलला सलामीला बढती द्यावी, हा सर्वात कठीण प्रश्न असणार आहे.
अवेळी पावसाचा अंदाज असूनही, येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन मानली जात आहे आणि धावसंख्येचा दबाव लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघावर कदाचित तितका प्रभावी ठरणार नाही, असा आतापर्यंतचा अनुभव आहे.