T20 World Cup Richest Cricketer: टी20 वर्ल्ड कपचा थरार सध्या शिगेला पोहोचला आहे. मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस सुरू असतानाच, खेळाडूंच्या कमाईचीही जोरदार चर्चा रंगू लागली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएलसारख्या फ्रँचायझी लीग्स आणि मोठ्या ब्रँड जाहिराती यांच्या जोरावर अनेक खेळाडूंनी कोट्यवधींची संपत्ती कमवली आहे. यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी असलेल्या टॉप क्रिकेटपटूंमध्ये काही नावे आघाडीवर आहेत.
या यादीत सर्वात वर आहे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल. आयपीएल आणि जगभरातील टी20 लीग्समधील करारांमुळे मॅक्सवेलच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. स्फोटक फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे तो फ्रँचायझी क्रिकेटमधील सर्वाधिक मागणी असलेल्या खेळाडूंमध्ये गणला जातो.
भारतीय संघातील स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या हा कमाईच्या बाबतीत मॅक्सवेलनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हार्दिक हा भारतातील सर्वाधिक अनुभवी टी20 खेळाडू आहे. आयपीएलमधील कर्णधारपद, मोठे करार आणि जाहिरातींमुळे त्याची कमाई वाढली आहे.
तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जोस बटलर आहे. आयपीएलमध्ये मिळणारी कोट्यवधींची बोली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे बटलरची ब्रँड व्हॅल्यू वाढली आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पण या यादीत आहे. बीसीसीआयचा ए-ग्रेड करार, आयपीएल सॅलरी आणि मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती हे त्याच्या कमाईचे प्रमुख स्रोत आहेत. सध्या तो जगातील सर्वोत्तम फास्ट बॉलर्सपैकी एक मानला जातो.
दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉक निवृत्तीनंतर पुन्हा मैदानात उतरला असून आयपीएल आणि इतर लीग्समधील सहभागामुळे त्यालाही मोठा आर्थिक फायदा झाला आहे. या सोबतचं भारताचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव आहे. मुंबई इंडियन्सकडून मिळणारी कोट्यवधींची रक्कम आणि वाढती लोकप्रियता यामुळे सूर्यकुमार आज जागतिक क्रिकेटमधील मोठ्या कमर्शियल चेहऱ्यांपैकी एक आहे.
तरुण फलंदाज इशान किशन याने आक्रमक खेळाच्या जोरावर अल्पावधीतच मोठी संपत्ती कमावली आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन हा या यादीतील एकमेव मल्याळी खेळाडू असून, आयपीएलमधील मोठ्या करारामुळे तोही टॉप कमाई करणाऱ्यांच्या यादीत आहे.
क्रिकेटमधील ‘फिनिशर’ म्हणून ओळखला जाणारा टीम डेव्हिड विविध देशांच्या टी20 लीग्समध्ये खेळून आपली आर्थिक स्थिती मजबूत करत आहे. तर ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर मार्कस स्टॉइनिस या टॉप-10 यादीत दहाव्या क्रमांकावर असून सातत्यपूर्ण कामगिरी आणि फ्रँचायझी क्रिकेटमधील मागणीमुळे तोही कमाईत पुढे आहे.