Virender Sehwag IPL prediction 2026
आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या (RCB) उत्कृष्ट कामगिरीवर माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने मोठी भविष्यवाणी केली आहे. तसेच कोणते दोन संघ बलाढ्य ठरतील, यावरही आपलं मत व्यक्त केले आहे.
'क्रिकबझ'च्या एका शोमध्ये या संघाच्या कामगिरीवर बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या ज्या पद्धतीने सलग सामने खेळत आहे आणि संघात जो समतोल दिसत आहे, ते पाहता हा संघ यावर्षीही ट्रॉफी सहज जिंकेल असेच वाटते. वीरेंद्र सेहवागने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू समोरील आव्हानांचाही उल्लेख केला आहे, पण आरसीबी यावर्षीही जेतेपदावर नाव कोरू शकते, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या ज्या पद्धतीने खेळत आहेत, ते पाहता यावर्षीही ट्रॉफी त्यांचीच (RCB) आहे असे वाटते. आरसीबीला टक्कर देणारा संघ म्हणजे 'जीटी' (गुजरात टायटन्स). जर त्यांनीही टॉप-२ मध्ये फिनिश केले, तर आरसीबीसाठी अडचण निर्माण होईल; कारण गुजरात टायटन्सचे गोलंदाजी युनिट देखील उत्कृष्ट आहे. या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये भिडताना पाहणे रंजक ठरेल, कारण त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही मजबूत आहे. त्यांचे टॉप-३ फलंदाज सातत्याने धावा करत आहेत. अहमदाबादच्या मैदानावर जर या संघाचे टॉप-३ फलंदाज चालले, तर ते सामना तिथेच संपवून टाकतात, असेही सेहवान याने सांगितले.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने रविवारी दुपारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सचा २३ धावांनी पराभव करत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आरसीबी या हंगामात प्लेऑफसाठी क्वालिफाय करणारा आयपीएलमधील पहिला संघ ठरला आहे.
गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने या हंगामात आतापर्यंत एकूण १३ सामने खेळले आहेत, ज्यापैकी ९ सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे, तर ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकूण १८ गुणांसह हा संघ क्वालिफाय झाला आहे. विशेष म्हणजे, आरसीबीचा अजून एक सामना बाकी आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने वर्ष २०२५ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. संघाने यावर्षीहीआपला हाच फॉर्म या हंगामातही कायम ठेवला आहे. आरसीबीचे सर्व खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत असून, प्लेऑफदरम्यान सलामीवीर फिल सॉल्ट देखील संघात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फिल सॉल्टच्या येण्याने संघाची सलामीची कमकुवत बाजू दूर होणार आहे.