भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाची इंग्लंड दौऱ्याची सुरुवात जरी अपेक्षेप्रमाणे झाली नसली तरी, आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय 19 वर्षांखालील संघाने त्यांच्या दौऱ्याची अत्यंत धडाकेबाज सुरुवात केली आहे. इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या युवा एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने 6 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला.
विशेष म्हणजे, भारतीय संघाने हा सामना अवघ्या 24 षटकांमध्येच जिंकला. भारताच्या या विजयात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक फलंदाजीचा सिंहाचा वाटा होता. त्याने आपल्या 48 धावांच्या खेळीत एकूण 8 चौकार आणि षटकार लगावले.
युवा एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना होव्ह येथील ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाने प्रथम फलंदाजी करताना 42.2 षटकांत 174 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात, भारतीय संघाकडून कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनी संघाला झंझावाती सुरुवात करून देत सामना पूर्णपणे एकतर्फी केला. वैभव आणि आयुष यांच्यात पहिल्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी झाली.
वैभवने आपल्या खेळीत केवळ 19 चेंडूंचा सामना करताना 5 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 48 धावांची शानदार खेळी साकारली. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 252.63 इतका होता. वैभव बाद झाल्यानंतर, अभिज्ञान कुंडूने 34 चेंडूंत नाबाद 45 धावांची खेळी करत भारतीय संघाला 6 गडी राखून विजय मिळवून दिला.
सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. कनिष्क चौहानने 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय मोहम्मद एनान, आर. एस. अंबरीश आणि हेनिल पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या संघातील 6 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. आता मालिकेतील दुसरा सामना 30 जून रोजी खेळवला जाईल.