Vaibhav Sooryavanshi youngest T20 captain : भारतातील देशांतर्गत टी-२० क्रिकेट स्पर्धा असलेल्या 'सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी'च्या नवीन हंगामाला आज (दि. १४) पासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत १५ वर्षीय 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीसाठी ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. आज मैदानात उतरणारच त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
'सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी'साठी बिहार संघाचा कर्णधार म्हणून वैभव सूर्यवंशीची नियुक्ती करण्यात आली आहे. आज इंदूरच्या होळकर स्टेडियमवर त्याचा संघ सौराष्ट्रविरुद्ध मैदानात उतरला आहे. बिहारने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. होळकर स्टेडियमवर नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच वैभव सूर्यवंशीने इतिहास घडवला आहे; तो टी-२० क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला असून, त्याने अधिकृतपणे एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) देशांतर्गत क्रिकेट विभागाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या कामगिरीची दखल घेतली आहे. 'एक्स' वर नाणेफेकीची माहिती देताना बीसीसीआयने म्हटले आहे: "बिहारने नाणेफेक जिंकून सौराष्ट्रविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या १५ व्या वर्षी, वैभव सूर्यवंशी पुरुषांच्या टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे."
याआधी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात तरुण कर्णधार होण्याचा विक्रम क्रोएशियाच्या झॅक वुकुसिकच्या नावावर होता. त्याने ७ ऑगस्ट २०२५ रोजी सायप्रस विरुद्धच्या सामन्यात १७ वर्षे ३११ दिवस वय असताना आपल्या संघाचे नेतृत्व केले होते.
मागील दोन वर्षे भारतीय क्रिकेट वर्तुळाच्या विश्वात चर्चेत राहिलेला भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच' आणि 'प्लेअर ऑफ द सीरीज' पुरस्कार जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे, तसेच भारतासाठी पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्येही अनेक महत्त्वाचे विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्याच्या दिमाखदार कारकिर्दीचा प्रारंभ २०२५ च्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) पासून झाला. राजस्थान रॉयल्स संघात त्याचा सहभाग होता. आपल्या पदार्पणाच्या आयपीएल हंगामातच त्याने प्रभावी कामगिरी केली. त्यानंतर २०२६ च्या हंगामात तर त्याने जबरदस्त प्रदर्शन करत 'प्लेअर ऑफ द सीरीज' आणि 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर' हे पुरस्कार पटकावण्यासोबतच 'ऑरेंज कॅप'ही मिळवली.
आयपीएल २०२६ मधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर वैभव सूर्यवंशीला आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय टी-२० आंतरराष्ट्रीय (T20I) संघात स्थान मिळाले. तो भारतीय संघात असला तरी त्याला अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात खेळण्याची फारशी संधी मिळालेली नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या आगामी हंगामात तो कर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो आणि आपल्या मोहिमेची सुरुवात कशी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.