Samson vs Vaibhav Sooryavanshi : ‘वैभव सूर्यवंशीला वगळा, सॅमसनला संधी द्या’; भारत-अफगाणिस्तान मालिकेपूर्वी रहाणेचे मोठे विधान

IND vs AFG T20 Series : 'सॅमसन-अभिषेक-इशान या त्रिकुटालाच पहिल्या तीन क्रमांकांवर स्थान मिळाले पाहिजे'
Samson vs Vaibhav Sooryavanshi : ‘वैभव सूर्यवंशीला वगळा, सॅमसनला संधी द्या’; भारत-अफगाणिस्तान मालिकेपूर्वी रहाणेचे मोठे विधान
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला १३ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. या अत्यंत महत्त्वाच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज अजिंक्य रहाणे याने भारतीय अंतिम अकरा (प्लेइंग इलेव्हन) खेळाडूंच्या निवडीबाबत आपले स्पष्ट मत मांडले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी मालिकेत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीऐवजी अनुभवी संजू सॅमसनला अंतिम अकरामध्ये संधी दिली जावी, असा स्पष्ट विचार रहाणेने व्यक्त केला असून त्यामागील तांत्रिक कारणेही त्याने स्पष्ट केली आहेत. अवघ्या १५ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण करून आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीसाठी ही निवड चर्चेचा विषय ठरली आहे.

आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर बोलताना अजिंक्य रहाणेने भारतीय संघाच्या फलंदाजी फळीवर भाष्य केले. तो म्हणाला की, ‘संघ व्यवस्थापनाने टी-२० विश्वचषकात खेळलेल्या अव्वल तीन (टॉप-३) फलंदाजांवरच विश्वास कायम ठेवणे गरजेचे आहे. संजू सॅमसनने उत्तम कामगिरी केली होती; मात्र केवळ दोन किंवा तीन डावांमध्ये अपयश आल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. सॅमसनला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळायला हवी.’

‘अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनीही सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाला मजबुती दिली आहे. त्यामुळे या दोघांसोबत सॅमसनलाच अग्रभागी उतरवणे योग्य ठरेल. वैभव सूर्यवंशी हा अत्यंत गुणवान खेळाडू असून त्याची वेळ नक्की येईल, मात्र सद्यस्थितीत विश्वचषकात भरीव योगदान देणाऱ्या संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या त्रिकुटालाच पहिल्या तीन क्रमांकांवर स्थान मिळाले पाहिजे,’ असे आग्रही प्रतिपादन रहाणेने केले.

टी-२० विश्वचषक २०२६ नंतर भारतीय संघात आघाडीच्या फळीत सातत्याने प्रयोग केले जात असल्याचे दिसून आले आहे. सॅमसन, अभिषेक आणि इशान या त्रिमूर्तीने यापूर्वी संघासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.

ब्रिटन दौऱ्यात लागोपाठ तीन सामन्यांत धावा करण्यात अपयशी ठरल्याने सॅमसनला अंतिम अकराबाहेर बसावे लागले होते आणि त्यामुळे वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली. मात्र, अखेरच्या टी-२० लढतीसाठी सॅमसनचे संघात पुनरागमन झाले होते. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वे दौऱ्यावर चमकदार कामगिरी बजावत दोन अर्धशतके झळकावली होती आणि त्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने 'मालिकावीर' पुरस्कारही पटकावला होता.

दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सर्व सामने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर अनुक्रमे १३, १५ आणि १७ सप्टेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. या मालिकेपूर्वी संघात काही महत्त्वाचे बदलही झाले आहेत. दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्या जागी यश ठाकूरला भारतीय टी-२० संघात तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी समाविष्ट करण्यात आले आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने सर्वाधिक दिलासादायक बाब म्हणजे स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून, तो अफगाणिस्तानविरुद्धच्या या मालिकेत मैदानावर आग ओकताना दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news