Vaibhav Sooryavanshi Pudhari
स्पोर्ट्स

Vaibhav Sooryavanshi : फायनलमध्ये श्रीलंका 'वैभव सूर्यवंशी'ला टार्गेट करणार का? मैदानातील वादळानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य

सुपर ओव्हरसारख्या चुरशीच्या सामन्यात भावना अनावर होणे स्वाभाविक

पुढारी वृत्तसेवा

Vaibhav Sooryavanshi Controversy : तिरंगी मालिकेच्‍या अंतिम सामन्यात रविवारी (दि.२१) भारत अ (India A) आणि श्रीलंका अ (Sri Lanka A) हे संघ आमनेसामने येणार आहेत. गेल्या सामन्यात झालेल्या मैदानातील वादानंतर श्रीलंका अ संघाचा कर्णधार सहान अराचिगे याने एक मोठे वक्तव्य केले आहे.

श्रीलंका संघाची फायनलमध्‍ये धडक

अफगाणिस्तान अ संघाचा १०३ धावांनी पराभव करत श्रीलंका अ संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. आता रविवारी संघाचा सामना भारतीय संघाशी होणार आहे.

'त्‍या' सामन्‍यात काय घडलं होतं?

भारत आणि श्रीलंका यांच्‍यातील सामना अत्यंत अटीतटीचा झाला आणि त्याचा निकाल 'सुपर ओव्हर'मध्ये लागला. शेवटच्या ३ चेंडूंवर १४ धावांची गरज असताना सूर्यवंशी भारताला विजय मिळवून देऊ शकला नव्हता. या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. हा वाद इतका वाढला की, या युवा भारतीय खेळाडूने श्रीलंकेच्या विशन हलमबागेला ढकलले होते. यानंतर वाद झाला. मैदानाबाहेर जातानाही संतप्‍त वैभवने श्रीलंकेच्‍या खेळाडूंकडे पाहत बोलत होता.

सुपर ओव्हरमधील 'त्या' वादावर काय म्हणाला कर्णधार अराचिगे ?

'स्पोर्टस्टार'शी बोलताना श्रीलंकेचा कर्णधार अराचिगे या वादावर म्‍हणाला की, अटीतटीच्‍या सामन्‍यात झालेला वाद आता मागे पडला आहे. आमचे खेळाडू कोणालाही किंवा कशालाही टार्गेट करत नाहीत. आम्ही फक्त आमच्या खेळाचा आनंद घेत आहोत. सुपर ओव्हरसारख्या चुरशीच्या सामन्यात भावना अनावर होणे स्वाभाविक आहे, ते सामान्य आहे."

फलंदाजीसह गोलंदाजांकडूनही उत्‍कृष्‍ट कामगिरी

अंतिम सामन्यापूर्वी अराचिगेने आपल्या संघाचा आत्मविश्वास वाढवला. तो म्हणाला, "आमच्या फलंदाजीत कोणतीही अडचण नाही. गोलंदाजीतही आमचे वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. मला वाटते की आमचा संघ सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे."

अंतिम सामन्‍यात सर्वांच्‍या असतील वैभव सूर्यवंशीवर नजरा

श्रीलंका अ संघाविरुद्धच्या गेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत अ संघ मैदानात उतरेल. या हाय-व्होल्टेज सामन्यात वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा आकर्षणाचे मुख्य केंद्र असणार आहे. मैदानातील त्या वादविवादानंतर दोन्ही संघ पुढे सरकले आहेत का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पण डंबुलाच्या संथ खेळपट्टीवर वैभवचा संयम आणि त्याची फलंदाजी यावर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील.

आयपीएलमध्‍ये वैभवची दमदार कामगिरी

१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची नुकतीच आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी भारताच्या मुख्य संघात निवड झाली आहे. नुकताच संपलेला आयपीएल २०२६ चा हंगाम त्याच्यासाठी स्वप्नवत राहिला आहे. त्याने १६ सामन्यांत २३७.३१ च्या थक्क करणाऱ्या स्ट्राईक रेटने आणि ७२ षटकारांसह तब्बल ७७६ धावा केल्‍या होत्‍या. आयपीएलमधील नेत्रदीपक कामगिरी आणि भारतीय संघात मिळालेले पहिले बोलावणे यांमुळे वैभवचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे. मात्र, डंबुलाच्या संथ खेळपट्ट्यांनी त्याच्या आक्रमक फलंदाजीवर काहीशी मर्यादा आणली असून, येथे त्याची खरी कसोटी लागत आहे. या डावखुऱ्या फलंदाजाला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आलेले नाही. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांत त्याने अनुक्रमे १४, ४४, २१ आणि ३८ धावा केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT