Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy record
टीम इंडियाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या विक्रमांच्या यादीत आणखी एका ऐतिहासिक कामगिरीची भर घातली आहे. दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा तो सर्वांत तरुण फलंदाज ठरला आहे. दुलीप ट्रॉफी २०२६ च्या सेंट्रल झोनविरुद्धच्या उपांत्य फेरीत ईस्ट झोनकडून खेळताना अवघ्या १५ वर्षीय वैभवने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने षटकार ठोकून अवघ्या ४२ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.
वैभवने ८१ चेंडूंत ९२ धावांची आक्रमक खेळी केली. दुर्दैवाने त्याचे शतक अवघ्या ८ धावांनी हुकले. मात्र, ईस्ट झोनसाठी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली त्याची ही आक्रमक खेळी संघाला भक्कम स्थितीत घेऊन गेली.
वय वर्ष १५ आणि १७५ दिवस असताना वैभवने तब्बल ५७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. यापूर्वी दुलीप ट्रॉफीत सर्वांत तरुण वयात अर्धशतक करण्याचा विक्रम हा लक्ष्मण सिंग यांच्या नावावर होता. त्यांनी १९६९ मध्ये वयाच्या १६ वर्षे २३ दिवसांत ही कामगिरी केली होती. वैभवने आता लक्ष्मण सिंग आणि पीयूष चावला (२०२५ मध्ये १६ वर्षे ३०७ दिवस) या दोघांनाही मागे टाकले आहे.
वैभव सूर्यवंशी: १५ वर्षे १७५ दिवस
लक्ष्मण सिंग (१९६९): १६ वर्षे २३ दिवस
पीयूष चावला (२०२५): १६ वर्षे ३०७ दिवस
या सामन्यात फलंदाजीसोबतच वैभवची एका अनपेक्षित भूमिकेतही चमक पाहायला मिळाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशन उजव्या मनगटाला दुखापत झाल्यामुळे मैदानाबाहेर गेला होता. त्यावेळी वैभवने सुमारे तासभर संघाचे तात्पुरते कर्णधारपद सांभाळले.या दरम्यान त्याने घेतलेला एक 'डीआरएस' (DRS) निर्णय निर्णायक ठरला. सेंट्रल झोनचा सलामीवीर आर्यन जुयाल ४६ धावांवर खेळत असताना मुकेश कुमारच्या चेंडूवर पंचांनी 'नाॉट आऊट' दिले. वैभवने स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवत रिव्ह्यू घेतला. अल्ट्राएजमध्ये (UltraEdge) चेंडू बॅटला लागल्याचे स्पष्ट झाले आणि ईस्ट झोनला मोठी विकेट मिळाली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून ईस्ट झोनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुकेश कुमार आणि अभिजित सरकार यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले, मोहम्मद शमी आणि मोहम्मद कोनैयन कुरेशी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. त्यामुळे सेंट्रल झोनचा पहिला डाव ८०.१ षटकांत २६६ धावांवर आटोपला.सेंट्रल झोनकडून रिंकू सिंगने सर्वाधिक ६० (८८ चेंडू) धावा केल्या, तर आर्यन जुयालने ४६ धावांचे योगदान दिले. १२५ वर ५ बळी अशी स्थिती असताना रिंकूने हर्ष दुबे (२७) सोबत ५५ धावांची भागीदारी केली. कुरेशीने ही जोडी फोडली. त्यानंतर यश ठाकूरच्या ३० धावांच्या जोरावर सेंट्रल झोनने २६६ धावांपर्यंत मजल मारली आहे.