

Novak Djokovic US Open upset : वर्षातील अखेरच्या अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम (US Open) टेनिस स्पर्धेत विजय मिळवत २५वे ग्रँडस्लॅम पटकवणारच, असा निर्धार दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने केला खरा; पण त्याचा हा आशावाद अवघा काही तासच टिकला. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात जोकोविच निकारीने झुंजला;पण त्याच्या वाट्याला स्वप्नभंगच आला. अर्जेंटिनाच्या बिगरमानांकित मारियानो नाव्होने याच्या समोर त्याला पराभव पत्करावा लागला.
अर्जेंटिनाच्या मारियानो नाव्होनेने पाच सेटच्या थरारक लढतीत माजी जागतिक अजिंक्य खेळाडू जोकोविचला पराभवाचा धक्का दिला. नाव्होनेने हा ऐतिहासिक सामना ७-६ (५), ५-७, ४-६, ६-२, ६-१ असा जिंकून यूएस ओपन २०२६ मधील सर्वात मोठ्या उलटफेराची नोंद केली.
सामन्यात २-१ अशी आघाडी आणि चौथ्या सेटमध्ये ब्रेक पॉइंट मिळवूनही जोकोविचला विजय कवेत घेता आला नाही. अतिशय दमट वातावरणात खेळल्या गेलेल्या या सामन्यात जोकोविचला तीव्र शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले. तिसऱ्या संचादरम्यान त्रास वाढल्याने त्याला मैदानावरच उलट्या झाल्या. मान आणि डोक्यावर बर्फाच्या पट्ट्या ठेवून शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न तो करत होता.
चौथा सेट ६-२ असा गमावल्यानंतर, निर्णायक पाचव्या संचापूर्वी जोकोविचने पाठीच्या दुखापतीसाठी वैद्यकीय मदत (मेडिकल टाईमआउट) घेतली. फिजिओच्या उपचारांनंतर जोकोविचने वेदनांवर मात करत कोर्टवर पुनरागमन केले. उपस्थित चाहत्यांनीही त्याला जोरदार पाठिंबा दिला. परंतु, नाव्होनेच्या आक्रमक टेनिससमोर जोकोविचचा शारीरिक कस टिकू शकला नाही, अखेर हा सेट १-६ ने गमावत तो स्पर्धेतूनच बाहेर पडला.
साडेचार तासांहून अधिक काळ चाललेल्या या संघर्षांनंतर ३९ वर्षीय जोकोविच जेव्हा कोर्टवरून बाहेर पडू लागला, तेव्हा संपूर्ण स्टेडियमने उभे राहून त्याच्या जिद्दीला दाद दिली. २४ ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकवणारा जोकोविच आणखी किती काळ टेनिस कोर्ट गाजवेल याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. आपण कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असल्याचे त्याने आधीच स्पष्ट केले असले, तरी २०२८ च्या लॉस एंजिलीस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा त्याचा मानस आहे.
पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे जोकोविचच्या नावे आहेत. मात्र, त्याने अखेरचे जेतेपद २०२३ मध्ये याच अमेरिकन खुल्या स्पर्धेत मिळवले होते. त्यानंतर त्याने सातत्याने उपांत्य आणि अंतिम फेरी गाठली असली, तरी २५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाने त्याला वारंवार हुलकावणी दिली होती. यंदा जोकोविचसाठी ही २०वी अमेरिकन खुली स्पर्धा होती. त्याने जिमी कॉनर्स, आंद्रे आगासी आणि फेलिसिआनो लोपेझ यांच्या विक्रमाशी बरोबरीही साधली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्याला २५व्या ग्रँडस्लॅमने हुलकावणी दिली आहे.