Vaibhav Sooryavanshi Controversy: भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये सामन्यानंतर वाद झाला होता हा वाद एकमेकांच्या अंगावर धावून जाणे आणि धक्का देणे इथंपर्यंत पोहचलं होतं. या प्रकरणी आयसीसीने जरी कडक कारवाई केली नसली तरी देशभरातून १५ वर्षाच्या युवा खेळाडूच्या अशा वागण्याबद्दल टीका होत आहे.
आता भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरने वैभवच्या या वर्तनाबाबत आपलं मत व्यक्त करून त्याला एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे.
श्रीलंकेविरूद्धचा सामना हा सुपर ओव्हरमध्ये गेला होता. मात्र या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. त्यावेळी वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये वाद झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार या वादामागे वैभवला उकसवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर वैभव या खेळाडूच्या अंगावर धावून गेला आणि तिथं ढकला ढकली झाली. यानंतर मैदानावरील खेळाडू आणि अधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली होती.
या घटनेनंतर आता वसीम जाफरने आपल्या यूट्यूबवर चॅनलवर वैभवबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. युवा फलंदाजाला या घटनेपासून काहीतरी शिकलं पाहिजे. तो आपली वेगानं ओळख बनवत आहे. विरोधी खेळाडू त्याला मानसिकदृष्ट्या त्रास देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार.
जाफर म्हणाला की, 'वैभवचे आता नाव आणि ओळख आहे. त्यामुळं पुढे देखील त्याला अनेक खेळाडू उकसवण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र कोणत्याही परिस्थिती तोंडाने आणि शारीरिक स्वरूपात भिडणे योग्य नाही. चूक पूर्णपणे वैभवची नसली तरी त्याचे वागणे योग्य नाही त्याने स्वत:वर नियंत्रण राखलंच पाहिजे. या घटनेनं त्याला एक शिकवण मिळाली असून भविष्यात तो अशी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळेल अशी आशा आहे.
वसीम जाफरने याबाबत सचिन तेंडुलकरचे उदाहरण दिलं. जाफरने सांगितलं की सचिन देखील फार कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लाला होता. मात्र तो क्वचितच एखाद्या वादात अडकला असेल. आशा आहे की वैभवला त्याचे आई-वडील आणि कोच जवळचे लोक देखील या विषयाबाबत काहीतरी सांगतील.
क्रिकेटमध्ये हलके फुलके वाद आणि ऑन फिल्ड ड्रामा हा खेळाचाच एक भाग आहे. यामुळं खेळाडूंच्या मानसिक कणखरतेची परीक्षा होते. मात्र या सर्व गोष्टी एका मर्यादेत रहाव्यात कोणत्याही खेळाडूने व्यक्तिगत टीका किंवा शारीरिक हिंसा करू नये.