Vaibhav Sooryavanshi Parents : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीसाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आगामी श्रीलंका आणि इंग्लंड (UK) दौऱ्यावर वैभवसोबत त्याच्या आई-वडिलांनाही प्रवास करण्याची विनंती बीसीसीआयने केली आहे. राष्ट्रीय संघात आणि मोठ्या खेळाडूंच्या वातावरणात वैभवला सहज जुळवून घेता यावे, यासाठी बोर्डाने ही खास व्यवस्था केली आहे.
राष्ट्रीय निवड समितीने नुकतीच वैभव सूर्यवंशीला भारताच्या टी-२० (T20I) संघात स्थान दिले आहे. वैभव पहिल्यांदाच वरिष्ठ संघात (Adult Squad) सामील होत असल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेतला. या दौऱ्यावर वैभवला पदार्पणाची संधी मिळाली, तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल. तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (१६ वर्षे आणि २०७ दिवस) विक्रम मोडीत काढेल.
'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सहसा खेळाडूंसोबत त्यांच्या पालकांना दौऱ्यावर जाण्याची परवानगी देत नाही. मात्र, वैभवमधील अफाट गुणवत्ता पाहता त्याला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी ही विशेष परवानगी देण्यात आली आहे. त्याची भारत 'अ' संघातून वरिष्ठ संघात निवड झाली आहे. वैभव अजून खूप लहान आहे, तो अल्पवयीन आहे.तो पूर्णपणे प्रौढ खेळाडू असलेल्या पुरुष संघासोबत प्रवास करणार आहे, तेव्हा त्याच्यासोबत त्याचे आई-वडील किंवा कुटुंबातील कोणीतरी असणे आम्हाला योग्य वाटते."
"आम्ही त्याच्या पालकांना विनंती करणार आहोत. जर त्यांची जाण्याची तयारी असेल, तर ते जाऊ शकतात. किंबहुना, त्याचे वडील उद्याच श्रीलंकेला रवाना होत आहेत. या दौऱ्यानंतर पालकांना इंग्लंडला जाण्याची इच्छा असेल, तर बीसीसीआय त्यांना पूर्ण पाठिंबा देईल. वरिष्ठ खेळाडूंसोबत जुळवून घेण्यासाठी वैभवला थोडा वेळ लागेल, त्या दृष्टीने आम्ही ही मदत करत आहोत. १५ वर्षांच्या या मुलाला वरिष्ठ खेळाडूंच्या जगात वावरताना कम्फर्टेबल वाटावे हाच यामागचा उद्देश आहे."
शनिवार, ६ जून रोजी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्य निवडकर्ता अजित आगरकर याने वैभवच्या निवडीवर सविस्तर भाष्य केले. अंडर-१९ दौरे आणि आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे वैभवने स्वतःच्या जोरावर संघात स्थान मिळवले असल्याचे आगरकरने सांगितले."त्याने खरोखरच आपल्या कामगिरीच्या जोरावर संघात जागा मिळवली आहे. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये त्याने जवळपास एकहाती राजस्थान रॉयल्सला पुढे नेले, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. एवढ्या लहान वयात, एवढ्या दबावाच्या आणि चुरशीच्या स्पर्धेत अशी कामगिरी करणे खरोखरच विशेष आहे," असे आगरकर म्हणाला.
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.