Usman Khawaja autobiography Australian cricket controversy 
स्पोर्ट्स

Usman Khawaja controversy : 'उस्मान ख्वाजा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा गद्दार'; फॅनी डिव्हिलियर्स यांची बोचरी टीका

डिव्हिलियर्सने ख्वाजाला सुनावले खडेबोल

रणजित गायकवाड

Usman Khawaja autobiography Australian cricket controversy

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याच्या आत्मचरित्रामुळे क्रिकेटविश्वात नव्या वादाला तोंड फुटले आहे. ख्वाजाने आपल्या 'सब्र' (Sabr) या आत्मचरित्रातून २०१८ मधील बहुचर्चित 'सँडपेपरगेट' प्रकरणाबाबत काही नवे खुलासे केले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या वादात आता दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज फॅनी डिव्हिलियर्स यांनीही उडी घेतली असून, त्यांनी ख्वाजावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. 'ख्वाजा हा कदाचित क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा गद्दार आहे,' असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.

'ख्वाजाने सहकाऱ्यांचा विश्वासघात केला'

'९१.३ स्पोर्ट्सएफएम'शी (91.3 SportsFM) बोलताना फॅनी डिव्हिलियर्स यांनी उस्मान ख्वाजाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या ४० ते ५० वर्षांतील क्रिकेटचा अनुभव आणि इतिहासातील घटनांचा संदर्भ देत त्यांनी ख्वाजाच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

डिव्हिलियर्स म्हणाले, "मी अधिकृतपणे सांगू इच्छितो की, ख्वाजा हा कदाचित क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा गद्दार आहे. गेल्या ४० ते ५० वर्षांत मी जे क्रिकेट पाहिले आणि वाचले आहे, त्यानुसार त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्याने स्वतःच्याच सहकारी खेळाडूंचा विश्वासघात केला आणि त्यांना अडचणीत आणले."

२०१८ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये घडलेले सँडपेपरगेट प्रकरण यापूर्वीच हाताळले गेले आहे. त्यातील चुका आणि गैरप्रकारांवर कारवाईही झाली होती. मात्र, आता जुन्या प्रकरणाला पुन्हा उजाळा देण्याची गरज नव्हती, असे मत त्यांनी व्यक्त केले. ख्वाजाने या प्रकरणातील गोष्टी पुन्हा सार्वजनिक करून ऑस्ट्रेलियन क्रिकेटची प्रतिमा मलिन केली असल्याचा आरोपही डिव्हिलियर्स यांनी केला.

त्यांच्या मते, हा वाद केवळ एखादी गोष्ट योग्य की अयोग्य, एवढ्यापुरता मर्यादित नाही. संबंधित प्रकरणावर यापूर्वीच निर्णय झाला असताना पुन्हा त्यातील जुन्या जखमा उकरून काढणे आणि सहकाऱ्यांना अडचणीत आणणे ही बाब चुकीची आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची भूमिका काय?

ख्वाजाच्या आत्मचरित्रातील खुलाशांनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही (CA) या वादावर भूमिका स्पष्ट करावी लागली आहे. २०१८ मधील सँडपेपरगेट प्रकरणाची नव्याने चौकशी केली जाणार नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, गोपनीयतेच्या कारणास्तव या प्रकरणाचा तपास अहवाल सार्वजनिक केला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींना आपली बाजू मांडता यावी, यासाठी एक स्वतंत्र आणि गोपनीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. इच्छुक व्यक्ती या व्यासपीठावर आपले म्हणणे मांडू शकतील. मात्र, कोणालाही त्यात सहभागी होण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. या प्रक्रियेसाठी आगामी काळात एका स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती करून कामकाजाच्या अटी आणि नियम निश्चित केले जातील.

या व्यासपीठावर मांडण्यात आलेल्या माहितीपैकी नेमकी कोणती माहिती सार्वजनिक करायची, याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलिया योग्य वेळी घेईल, असेही ग्रीनबर्ग यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ख्वाजाच्या आत्मचरित्रातील खुलाशांमुळे २०१८ मधील सँडपेपरगेट प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून, ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील जुन्या वादाला नव्याने फोडणी मिळाली आहे. फॅनी डिव्हिलियर्स यांच्या आक्रमक विधानामुळे या वादाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT