Vaibhav Suryavanshi IPL Debut: अतिशय कमी वयात क्रिकेटच्या मैदानावर धडाकेबाज फलंदाजी करणारा तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. अवघ्या १४व्या वर्षी त्याने केलेल्या कामगिरीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. आयपीएलमधील सर्वात कमी वयाचा खेळाडू आणि क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी वयाचा शतकवीर म्हणून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आयपीएलमध्ये पदार्पण करतानाच सूर्यवंशीने पहिल्याच सामन्यात दमदार सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने हा षटका भारतीय कसोटी संघाचा गोलंदाज शार्दुल ठाकूरला मारला होता. त्या वेळी सूर्यवंशीचे वय फक्त १४ वर्ष होतं.
दरम्यान, या पदार्पणाशी संबंधित एक मजेदार किस्सा राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार संजू सॅमसनने सांगितला आहे. बीसीसीआयच्या ‘नमन अवॉर्ड्स २०२६’ कार्यक्रमात बोलताना सॅमसनने या तरुण खेळाडूच्या आत्मविश्वासाचा किस्सा सांगितला.
संजूने सांगितलं की, आयपीएल पदार्पणाच्या एक दिवस आधी त्याने आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सूर्यवंशीला बोलावून चर्चा केली होती. एवढ्या लहान वयात मोठ्या स्पर्धेतील दबाव तो कसा हाताळेल, याबद्दल दोघांनाही उत्सुकता होती.
जेव्हा द्रविड यांनी त्याला सामन्याबद्दलचा प्लॅन विचारला, तेव्हा सूर्यवंशीने अतिशय साधे पण आत्मविश्वासपूर्ण उत्तर दिले. त्याने सांगितले की कोणताही खास प्लॅन नाही. चेंडू आपल्या टप्प्यात आला तर तो थेट मैदानाबाहेर पाठवणार.
संजूने सांगितलं की, त्या वेळी हे उत्तर ऐकून त्याला थोडे आश्चर्य वाटले. पण सामन्यात नेमकं तेच घडलं. सूर्यवंशीला पहिलाच चेंडू टप्प्यात आला आणि त्याने तो थेट मैदानाबाहेर पाठवला.
हा प्रसंग सांगत सॅमसन हसत हसत म्हणाला की, त्या क्षणी त्याला असे वाटले की एखादा व्हिडिओ गेम सुरू आहे. मैदानावर दाखवलेल्या आत्मविश्वासामुळे सूर्यवंशीने सर्वांनाच प्रभावित केलं.
अवघ्या १४व्या वर्षी इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर निर्भयपणे खेळण्याची त्याची शैली पाहून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यात हा तरुण खेळाडू भारतीय क्रिकेटमध्ये मोठे स्थान मिळवेल, अशी चर्चा सध्या रंगली आहे.