#TokyoOlympics : शरथ कमल याला तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला.  
स्पोर्ट्स

#TokyoOlympics : टेबल टेनिसमधील भारताचे आव्हान संपुष्टात, शरथ कमल याला तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का

दीपक दि. भांदिगरे

टोकियो; पुढारी ऑनलाईन : आपल्या चौथ्या ऑलिम्पिकमध्ये (#TokyoOlympics) सहभाग नोंदविणारा भारताचा दिग्गज टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल याला तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. तिसऱ्या फेरीत शरथ कमलला चीनच्या जागतिक चॅम्पियन मा लांग याने हरवले. यामुळे भारताचे टोकियो ऑलिम्पिकच्या (#TokyoOlympics) टेबल टेनिस खेळामधील आव्हान संपुष्टात आले आहे.

शरथला चीनच्या मा लांगने ४-१ अशा सेटमध्ये हरवले. तिसऱ्या फेरीत शरथने चिनी खेळाडूला कडवी टक्कर दिली. हा सामना ४६ मिनिटे चालला.

पुरुष एकेरीतील तिसऱ्या फेरीत शरथ पहिला सेट ७-११ ने हारला. तर दुसऱ्या सेटमध्ये शरथने चांगला खेळ केला. त्याने हा सेट ११-८ ने जिंकला. मात्र, शरथ तिसरा आणि चौथा सेट हारला. या पराभवामुळे शरथचे टेबल टेनिसमधील आव्हान संपले आहे.

टेबल टेनिसमध्ये भारताच्या अपेक्षा या शरथ कमलवर अवलंबून होत्या. मात्र, मंगळवारी तिसर्‍या फेरीत त्याला चीनच्या मा लांगच्या आव्हानाचा सामना करावा लागला. लांग हा सध्या जागतिक चॅम्पियन आहे.

दरम्यान, टेबल टेनिसच्या महिला एकेरीतील भारताचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे. मनिका बत्रा हिचा तिसऱ्या आणि सुतिर्था मुखर्जी हिचा दुसऱ्या फेरीत पराभव झाला.

महिला एकेरीतही निराशा…

मनिकाने यापूर्वी आपल्यापेक्षा चांगली क्रमवारी असलेल्या खेळाडूंना पराभूत केले आहे. मात्र, तिसर्‍या फेरीत ऑस्ट्रियाच्या सोफियासमोर तिचा निभाव लागला नाही. तिला केवळ २२ मिनिटांत सामना ०-४ (३-११, ३-११, ५-११, ५-११) असा गमवावा लागला.

यापूर्वीच मनिका आणि शरथ मिश्र दुहेरीत पराभूत झाले आहेत.

महिला एकेरीच्या अन्य सामन्यात सुतिर्थाचा पोर्तुगालच्या खेळाडूसमोर निभाव लागला नाही. तिने केलेल्या चुकांचा फायदादेखील पोर्तुगालच्या खेळाडूंना मिळाला. तर, भारताचा पुरुष एकेरीतील अन्य खेळाडू जी साथियानला दुसर्‍या फेरीत पराभूत व्हावे लागले होते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT