स्पोर्ट्स

T20 WC India vs Pakistan | "आमचे विमान बुक...." : भारत-पाकिस्‍तान सामन्‍याबाबत कर्णधार सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

१५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्याबाबत भारतीय संघाची भूमिका केली स्‍पष्‍ट

पुढारी वृत्तसेवा

Suryakumar Yadav T20 WC India vs Pakistan match

नवी दिल्ली : पाकिस्‍तानच्‍या हट्‍टवादी भूमिकेमुळे आगामी टी-२० विश्वचषक २०२६ मधील या संघाचा भारतबरोबरील सामना सध्या वादाच्‍या भोवर्‍यात अडकला आहे. पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली असली, तरी भारतीय संघ मात्र मैदानात उतरण्यास सज्ज असल्याचे कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले आहे. या सामन्‍याबाबत सूर्यकुमारने मौन सोडले आहे.

बहिष्कार आमचा नाही, दुसऱ्या बाजूचा!

टी-२० विश्वचषक २०२६ च्या 'कॅप्टन्स डे' पत्रकार परिषदेत १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्याबाबत सूर्या म्हणाला, "आमची मानसिकता स्पष्ट आहे. आम्ही या सामन्याला नकार दिलेला नाही. बहिष्काराची चर्चा दुसऱ्या बाजूने (पाकिस्तान) सुरू झाली आहे. आयसीसीने अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून, बीसीसीआय आणि सरकारने आयसीसीच्या सहमतीने तटस्थ ठिकाण (न्यूट्रल व्हेन्यू) निश्चित केले आहे. त्यामुळे आम्ही तिथे नक्कीच जाणार."

भारतीय संघ सामन्‍यासाठी रवाना होणार

भारतीय संघ आधी ७ फेब्रुवारीच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करत असून, त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी रवाना होईल, असेही कर्णधार सूर्यकुमारने स्‍पष्‍ट केले.

पाकिस्तानची ताठर भूमिका

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी पुन्हा एकदा आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. "खेळात राजकारण नको, परंतु आम्ही विचारपूर्वक हा निर्णय घेतला असून भारत-पाक सामन्यावर बहिष्कार घालण्यावर आम्ही ठाम आहोत," असे त्यांनी इस्लामाबादमधील मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यानेही 'आम्ही सरकारच्या सूचनांचे पालन करू',असे स्पष्ट केले आहे.

आयसीसीचा निर्णय आम्हाला मान्य: बीसीसीआय

पाकिस्तानच्या या पवित्र्यावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "या विषयावर बीसीसीआयला काहीही बोलायचे नाही. हा आयसीसीचा निर्णय असेल आणि आयसीसी जो काही निर्णय घेईल, त्यानुसार आम्ही पुढे जाऊ."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT