

T20 World Cup 2026: T-20 वर्ल्ड कप 2026 सध्या चर्चेत आहे. भारत आणि श्रीलंका येथे 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत पाकिस्तानला सहभागी होण्याची अधिकृत परवानगी मिळाली असली, तरी भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. पाकिस्तानने भारताविरुद्धचा ग्रुप स्टेज सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणारा भारत-पाकिस्तान ग्रुप स्टेज सामना खेळला जाणार नाही, असा निर्णय पाकिस्तान सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाचा थेट फायदा भारताला होणार असून, नियमांनुसार भारताला वॉकओव्हरच्या माध्यमातून दोन गुण मिळणार आहेत. T-20 सारख्या स्पर्धेत हे दोन गुण अतिशय महत्त्वाचे ठरू शकतात.
या संपूर्ण वादामागे सुरक्षा आणि राजकीय संवेदनशीलता हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. याआधी झालेल्या काही आंतरराष्ट्रीय वादानंतर आणि आयसीसीवर लावण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचे मानले जाते. गेल्या वर्षी झालेल्या चर्चांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी स्पर्धांदरम्यान एकमेकांच्या देशात न जाण्याबाबत सहमती झाली होती आणि सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्यावर भर देण्यात आला होता.
याच मुद्द्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यात झालेल्या बैठकीनंतर भारताविरुद्धचा ग्रुप स्टेज सामना न खेळण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारताविरुद्ध सामना न खेळल्याचा सर्वात मोठा फटका पाकिस्तानलाच बसू शकतो. ग्रुप स्टेजमधून पुढे जाण्यासाठी फक्त पहिले तीन संघचं पात्र ठरणार आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानला अमेरिका, नेदरलँड्स आणि नामीबिया यांच्याविरुद्धचे सर्व सामने जिंकणे अनिवार्य आहे. केवळ विजयच नव्हे, तर नेट रनरेटही पाकिस्तानसाठी निर्णायक ठरू शकतो. पावसामुळे एखादा सामना रद्द झाला किंवा एखाद्या दिवशी सामना काही कारणास्तव रद्द झाला, तर पाकिस्तानचे आव्हान धोक्यात येऊ शकते.
स्पर्धेतील सर्वात मोठा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. जर भारत आणि पाकिस्तान सेमीफायनल किंवा फायनलमध्ये आमने-सामने आले, तर नेमकं काय होणार? या संदर्भात आयसीसी किंवा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अजून कोणतेही उत्तर आले नाही.
नॉकआउट सामन्यात भारत-पाकिस्तान लढत ही आयसीसीसाठी आर्थिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची असते. प्रसारण हक्क, जाहिराती आणि जागतिक प्रेक्षकसंख्या यामुळे या सामन्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
जर पाकिस्तानने नॉकआउटमध्येही भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला, तर हा केवळ एका संघाचा निर्णय न राहता संपूर्ण स्पर्धेच्या विश्वासार्हतेवर आणि आयसीसीच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरेल.
सध्या तरी भारत-पाकिस्तान सामन्याबाबत स्पष्टता नाही. ग्रुप स्टेजमध्ये भारताला वॉकओव्हर मिळणार हे निश्चित असले, तरी नॉकआउट टप्प्यात काय होणार, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत आयसीसी या मुद्द्यावर कोणती भूमिका घेते, यावरच या अंतिम निकाल अवलंबून असेल.