आयुष्यात असा टप्पा येतो जेव्हा तुम्हाला वाटते तुम्ही काहीतरी नवीन शिकत आहात
सध्या मी शिकण्याच्या प्रक्रियेतून जात आहे
खराब फॉर्म म्हणजे शिकण्याची प्रक्रिया
suryakumar yadav on his form
अहमदाबाद: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. मात्र या कठीण काळातही त्याचा आत्मविश्वास डगमगलेला नाही. अहमदाबाद येथील जीएलएस युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सूर्याने आपल्या फॉर्मवर भाष्य केले. "सध्या मी शिकण्याच्या प्रक्रियेतून जात आहे, ज्या दिवशी माझा धमाका होईल, तेव्हा काय होईल हे सर्वांना माहित आहे," असे त्याने केलेले विधान सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एका खेळाडूच्या कारकिर्दीतील चढ-उतारांवर बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, "खेळाडू नेहमीच चांगल्या फॉर्ममध्ये नसतो. मी याला 'वाईट काळ' म्हणणार नाही, तर ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. आयुष्यात असा एक टप्पा येतो जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही काहीतरी नवीन शिकत आहात. माझ्यासाठी सध्या तोच काळ सुरू आहे."
आपल्या कामगिरीवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना सकारात्मक पवित्रा घेत सूर्यकुमार यादव म्हणाला, "संघातील इतर १४ खेळाडू सध्या माझ्या जागी जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना माहित आहे की, ज्या दिवशी मी फॉर्मात येईन, तेव्हा काय होईल. परीक्षेत कमी गुण मिळाले तर आपण शाळा सोडत नाही, उलट अधिक मेहनत करून चांगले गुण मिळवतो. मी सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न करत आहे."
सूर्यकुमार यादवसाठी २०२५ हे वर्ष बॅटिंगच्या दृष्टीने अत्यंत निराशाजनक राहिले आहे. त्याची आकडेवारी पाहिली तर संघ व्यवस्थापनाची चिंता वाढवणारी आहे. त्याने या वर्षी एकुण १९ डावांमध्ये २१८ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी केवळ सरासरी: १३.६२ इतकी आहे. तर आशिया चषकामध्ये सर्वोच्च धावसंख्या ४७ आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेतही त्याला ४ डावांत केवळ ३४ धावा करता आल्या होत्या. असे असूनही निवडकर्त्यांनी शुभमन गिलला संघातून डच्चू दिला असला तरी सूर्यकुमारवरचा विश्वास कायम ठेवला आहे.
पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव अहमदाबादमध्ये बोलला त्याप्रमाणे आपल्या शब्दांना धावांमध्ये रुपांतर करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.