

अंतिम सामन्यातील पराभवानंतर मी पूर्णपणे निराश झालो होतो
मला वाटत होतं की, माझ्याकडे काही शिल्लकच राहिलेलं नाही
मानसिकदृष्ट्या सावरण्यासाठी अनेक महिने लागले
Rohit Sharma on ODI World Cup 2023
नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये २०२३ च्या वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर क्रिकेट पूर्णपणे सोडण्याचा विचार केला होता. मी पूर्णपणे निराश झालो होतो. मला वाटत होतं की, मला आवडणारा खेळ माझ्याकडून सर्व काही हिरावून घेत आहे. माझ्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही. त्यामुळे हा खेळ खेळायचा नाही, असे मला वाटले होते, अशा शब्दांमध्ये टीम इंडियाचा वन-डेमधील स्टार फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या निवृत्तीच्या विचारावर भाष्य केले.
रविवारी (दि. २१ डिसेंबर) मास्टर्स युनियनच्या कार्यक्रमात बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, २०२३ च्या विश्वचषक फायनलनंतर मी पूर्णपणे निराश झालो होतो. मला असे वाटले की, "आता मला हा खेळ खेळायचा नाही. कारण त्याने माझ्याकडून सर्व काही काढून घेतले होते. माझ्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही."
रोहित म्हणाला की, २०२२ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व माझ्याकडे आले. तेव्हापासून मी संघात प्रचंड भावनिकरित्या गुंतला गेलो. त्यामुळे २०२३ मध्ये झालेल्या वन-डे विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभव हा खूपच वेदनादायी ठरला. संघातील प्रत्येकजण खूप निराश होता. काय झाले यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. माझ्यासाठी तो वैयक्तिकरित्या खूप कठीण काळ होता. मी कर्णधार झाल्यापासून विश्वचषक स्पर्धेसाठी सर्वस्व पणाला लावले होते.”
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर माझ्या शरीरात कोणतीही ऊर्जा उरली नव्हती. मला सावरण्यासाठी आणि स्वतःला पूर्वपदावर आणण्यासाठी काही महिने लागले. आत्मपरीक्षण आणि खेळावरील प्रेमाची आठवण यामुळे त्याला पुन्हा मार्ग सापडला.
वन-डे विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने भारताला टी-२० विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले. याबाबत बोलताना रोहित म्हणाला, “मला माहीत होते की आयुष्य तिथेच संपत नाही. तो एक मोठा धडा होता. निराशेला कसे सामोरे जायचे, पुन्हा सुरुवात कशी करायची आणि नव्याने सुरुवात कशी करायची—आता हे म्हणायला खूप सोपे आहे, पण त्या क्षणी ते अत्यंत कठीण होते,” अशी कबुलीही त्याने दिली.
२०२३ मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मायदेशात सलग दहा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली होती. पण सर्वात महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. भारताला २४० धावांवर रोखले. ट्रॅव्हिस हेडच्या सामना-विजयी शतकाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला सहा गडी राखून विजय मिळवून दिला होता.