जयपूर : सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा तोच फॉर्म मिळवला आहे, ज्याची त्याला आणि मुंबईच्या चाहत्यांना अपेक्षा होती. सूर्याच्या बॅटमधून सातत्याने धावा निघत आहेत. गुरुवारी (दि. 1) राजस्थान रॉयल्सविरुद्धही सुर्याने 23 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 48 धावा तडकावल्या. ही खेळी संघासाठी फायदेशीर ठरली. ज्यामुळे मुंबईने 2018 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान, या सामन्यादरम्यान त्याने असा विक्रम रचला, जो यापूर्वी आयपीएलमध्ये कधीच झाला नव्हता. एका अर्थाने त्याने रॉबिन उथप्पाचा विक्रम मोडीत काढला आहे.
सूर्यकुमार यादव जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये राजस्थानविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याच्या आधी मुंबई इंडियन्सचे सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी 116 धावांची भागिदारी करून संघाचा पाया भक्कम केला होता. यानंतर सूर्यकुमार यादवनेही आल्या आल्या वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. त्याने काही मिनिटातच 25 धावा पूर्ण केल्या. सूर्याचा हा सलग 11 वा डाव होता ज्यामध्ये त्याने 25 पेक्षा जास्त धावा केल्या. 2024 च्या सुरुवातीला, रॉबिन उथप्पाने त्याच्या संघासाठी सलग 10 सामन्यांमध्ये 25 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या, आता सूर्यकुमार यादवने त्याला मागे टाकले आहे. म्हणजेच, आयपीएलमध्ये आतापर्यंत जे काम झाले नाही, ते सूर्यकुमार यादवने पूर्ण केले आहे.
सूर्याने या वर्षी एकाही सामन्यात 25 पेक्षा कमी धावा केल्या नाहीत. त्याने या वर्षी 11 सामने खेळून आतापर्यंत 400 हून अधिक धावा फटकावल्या आहेत. सध्या सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहचला असून त्याने ऑरेंज कॅप पटकावली आहे. या वर्षी त्याने आतापर्यंत पाच अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे.
सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्यावरून असे दिसते की मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल. संघाची सुरुवात खूपच खराब झाली असली तरी त्यानंतर सलग पाच सामने जिंकून संघाने पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे.