shreyas iyer 34 runs away breaking virat kohli & shikhar dhawan record
राजकोट : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना १४ जानेवारी रोजी राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे भारतीय संघ सध्या १-० ने आघाडीवर आहे. या महत्त्वाच्या लढतीत टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याला एक खास विश्वविक्रम प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
श्रेयस अय्यरने या सामन्यात केवळ ३४ धावा केल्यास, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद ३००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरेल. या कामगिरीसह तो भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन आणि 'रन मशीन' विराट कोहली या दोघांनाही मागे टाकेल.
भारतीय फलंदाजांमध्ये सध्या सर्वात जलद ३००० एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. धवनने ७२ डावांमध्ये ही किमया साधली होती, तर विराट कोहलीला हा टप्पा गाठण्यासाठी ७५ डाव लागले होते. श्रेयस अय्यरने आतापर्यंत ६८ डावांत फलंदाजी केली आहे. जर त्याने राजकोटमध्ये ३४ धावा केल्या, तर त्याच्या ६९ डावांत ३००० धावा पूर्ण होतील आणि तो भारताचा नवा विक्रमवीर ठरेल.
शिखर धवन : ७२ डाव
विराट कोहली : ७५ डाव
के.एल. राहुल : ७८ डाव
नवजोत सिंह सिद्धू : ७९ डाव
सौरव गांगुली : ८२ डाव
जागतिक क्रिकेटचा विचार केल्यास, श्रेयस अय्यर ३४ धावा करून वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर विवियन रिचर्ड्स यांच्या पंक्तीत जाऊन बसेल. रिचर्ड्स यांनीही ६९ डावांत ३००० धावांचा टप्पा गाठला होता. यामुळे श्रेयस संयुक्तपणे जगात चौथ्या स्थानावर पोहोचू शकतो. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा हशिम आमला अव्वल स्थानी असून त्याने अवघ्या ५७ डावांत हा विक्रम केला होता.
२०१७ मध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरचा प्रवास दुखापतींमुळे चढ-उतारांचा राहिला आहे. मात्र, अलीकडेच दुखापतीतून सावरून त्याने 'विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६' मधून मैदानात पुनरागमन केले. या स्पर्धेत त्याने ८२ आणि ४५ धावांच्या खेळी केल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रेयसने ४७ चेंडूत ४९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. आता राजकोटमध्ये तो या फॉर्मचे रूपांतर मोठ्या विक्रमात करण्यासाठी सज्ज झाला आहे.