संजू सॅमसनच्या खेळीचे सुनील गावस्‍कर यांनी भरभरून कौतुक केले आहे. Pudhari
स्पोर्ट्स

Sunil Gavaskar | 'शतकासाठी स्वार्थी व्हावे लागले असते'; संजू सॅमसनच्या रिॲक्‍शनवर सुनील गावस्‍कर म्‍हणाले, "संयम नेहमीच.."

Sunil Gavaskar on Sanju Samson | संजूच्‍या खेळीने चेन्नईने नोंदवला हंगामातील पाचवा विजय

पुढारी वृत्तसेवा

IPL 2026 Sunil Gavaskar on Sanju Samson

नवी दिल्ली : टी 20 विश्‍वचषक स्‍पर्धेनंतर संजू सॅमसनने पुन्‍हा एकदा आपल्‍या दमदार फलंदाजीने चाहत्‍यांना खुश केले आहे. मंगळवारी (दि. ५ मे) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ५२ चेंडूत नाबाद ८७ धावांची खेळी करत त्याने चेन्नई सुपर किंग्सला (CSK) हंगामातील पाचवा विजय मिळवून दिला. सॅमसनच्या या खेळीचे भारताच्या दिग्गज फलंदाजांनी भरभरून कौतुक केले आहे.

संयमी सुरुवातीनंतर संजूने घेतला आक्रमक पवित्रा

सुरुवातीला संथ वाटणाऱ्या खेळपट्टीवर संजू सॅमसनने वैयक्तिक मैलाच्या दगडापेक्षा संघाच्या विजयाला प्राधान्य दिले. संयमी सुरुवात केल्यानंतर त्याने योग्य वेळी आक्रमक पवित्रा घेत दिल्लीच्या फिरकीपटूंचा समाचार घेत ८७ धावांची खेळी केली.

कार्तिक शर्माबरोबर ११४ धावांची नाबाद भागीदारी

१५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची अवस्था २ बाद ४५ अशी झाली होती. त्यावेळी सॅमसनने जबाबदारी स्वीकारली. सुरुवातीला त्याने २२ चेंडूत २२ धावा केल्या होत्या, मात्र १२ व्या षटकापासून त्याने गिअर बदलला आणि अर्धशतक झळकावले. त्याला कार्तिक शर्माची मोलाची साथ लाभली. या दोघांनी ६६ चेंडूत ११४ धावांची नाबाद भागीदारी करून दिल्लीच्या हातातून सामना हिसकावून घेतला.

मला शतकासाठी थोडे स्‍वार्थी व्‍हावे लागले असते...

सामन्यानंतर हर्ष भोगले यांच्याशी बोलताना संजू सॅमसन म्हणाला, "शतक नेहमीच खास असते, पण त्यासाठी मला थोडे स्वार्थी व्हावे लागले असते. 'मला स्ट्राईक द्या किंवा सिंगल घेऊ द्या' असे मी म्हटले नाही. त्यापेक्षा संघाला विजय मिळवून देणे मला जास्त महत्त्वाचे वाटले."

सुनील गावसकर यांच्‍याकडून कौतुक

संजूने संघासाठी केलेल्‍या खेळीने टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर प्रभावित झाले आहेत. ते "संयम नेहमीच फळ देतो. संजूने आधी स्वतःला स्थिरावले आणि नंतर वेग वाढवला. कार्तिकने शेवटचे काही फटके मारले नसते, तर संजूचे शतक पूर्ण झाले असते. पण त्याने संघासाठी खेळणे पसंत केले." वीरेंद्र सेहवागनेही संजूच्या बदललेल्या खेळाचे कौतुक केले. तो म्हणाला, "संजू आता फक्त त्याच्या झोनमध्ये असलेल्या चेंडूंवरच आक्रमण करतोय. गेल्या काही वर्षांत त्याच्या खेळामधील समज कमालीची सुधारली आहे."

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पाचव्या स्थानी

संजू सॅमसन या हंगामात दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावणारा एकमेव खेळाडू आहे. सध्या ४०२ धावांसह तो 'ऑरेंज कॅप'च्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहे. चेन्नईला बाद फेरीत पोहोचायचे असेल, तर संजूची ही कामगिरी कायम राहणे अत्यंत आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT