मुंबई : भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसन सध्या यशाच्या शिखरावर आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्यात संजूने मोलाची भूमिका बजावली. मात्र, या यशामागे त्याचे प्रचंड समर्पण आणि शिस्तबद्ध जीवनशैली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत कडक डाएट पाळणाऱ्या संजूने विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यात मात्र त्याचा हा प्लॅन मोडून काढला आणि एका खास पदार्थाचा आस्वाद घेतला. याबाबतचा खुलासा त्याच्या वैयक्तिक शेफने केला आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये संजू सॅमसनने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्म दाखवला. वेस्ट इंडिजविरुद्ध ९७*, इंग्लंडविरुद्ध ८९ आणि न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ८९ धावांची वादळी खेळी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधले. अवघ्या ५ सामन्यांत ३२१ धावा फटकावून तो 'प्लेअर ऑफ द सिरीज' ठरला. प्रसिद्ध शेफ सुरेश पिल्लई यांनी नुकतेच सोशल मीडियावर सांगितले की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक विजयानंतर संजूने तीन महिन्यांपासून सुरू असलेला कडक डाएट बाजूला ठेवून आपल्या आवडीच्या जेवणाची फर्माइश केली होती.
सॅमसनचे मॅनेजर इखलास यांनी पिल्लई यांच्याशी संपर्क साधून या खास प्रसंगी त्याच्या आवडीच्या जेवणाची व्यवस्था करण्याची विनंती केली होती.
शेफ पिल्लई यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत या अनुभवाचे सविस्तर वर्णन केले आहे. सॅमसनच्या मॅनेजरने त्यांना संदेश पाठवला होता की, ‘वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना अप्रतिम झाला. संजू खूप आनंदी आहे. आम्ही सध्या मुंबईत आहोत. तो गेल्या तीन महिन्यांपासून कठोर डाएटवर आहे, पण आज त्याला काहीतरी वेगळे खावेसे वाटतेय. तुम्ही त्याच्यासाठी 'पझकंजी, मासे, कप्पा आणि चम्मनथीची व्यवस्था करू शकाल का?’
पिल्लई यांनी पुढे लिहिले, ‘मुंबईत संध्याकाळी ७ वाजता पजान कांजी? मला हसूच आले. पजान कांजी कदाचित शक्य होणार नाही, पण पझकंजी, कप्पा आणि मासे नक्कीच तयार होतील.’ केरळमध्ये पझकंजी आणि कप्पा हे अत्यंत लोकप्रिय पारंपरिक पदार्थ आहेत.
संजूच्या यशाबद्दल बोलताना शेफ पिल्लई भावूक झाले. त्यांनी लिहिले की, ‘प्रत्येक मोठ्या स्पर्धेपूर्वी संजू जे बलिदान देतो, ते जगाला दिसत नाही. फोन बंद, सोशल मीडियापासून लांब आणि अनेक महिने शांतपणे केलेली कठोर तयारी, हेच त्याच्या यशाचे खरे गमक आहे. प्रत्येक मल्याळी माणसाची छाती अभिमानाने फुलून यावी, अशी कामगिरी त्याने करून दाखवली आहे.’
विश्वचषकातील या देदीप्यमान कामगिरीनंतर संजू सॅमसन आता आयपीएल २०२६ मध्ये खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, यंदा तो चेन्नई सुपर किंग्स (CSK)च्या पिवळ्या जर्सीत मैदानात उतरणार आहे. राजस्थान रॉयल्सकडून ट्रेड झाल्यानंतर सॅमसन आता धोनीच्या ताफ्यात कोणती कमाल करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.