

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात आता आगामी काळातील नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघाचा स्टार सलामीवीर संजू सॅमसन हा सूर्यकुमार यादवचा उत्तराधिकारी म्हणून प्रबळ दावेदार ठरू शकतो, असे भाकीत एका माजी भारतीय क्रिकेटपटूने वर्तवले आहे.
सूर्यकुमार यादवने कपिल देव, महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांच्या मांदियाळीत स्थान मिळवत भारताला चौथे विश्वविजेतेपद मिळवून दिले आहे. मात्र, ३५ वर्षीय सूर्यासाठी २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकापर्यंत तंदुरुस्ती आणि फॉर्म टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान असेल. तोपर्यंत सूर्या ३७ वर्षांचा होईल, त्यामुळे बीसीसीआय दीर्घकालीन नियोजनाचा भाग म्हणून नेतृत्वात बदल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शुभमन गिलच्या खराब फॉर्ममुळे निवड समितीला पर्यायांचा विचार करावा लागत आहे. अशातच विश्वचषकात सलग तीन अर्धशतके झळकावून 'मालिकावीर' ठरलेल्या ३१ वर्षीय संजू सॅमसनचे पारडे जड मानले जात आहे. माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफच्या मते, संजूकडे नेतृत्व गुण असून त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे.
‘पुढचा कर्णधार कोण असेल हे सांगणे कठीण असले, तरी संजू सॅमसन एक उत्तम पर्याय आहे. कर्णधार असा हवा ज्याने जगाचा अनुभव घेतला असेल, जो गोलंदाजीतील बदल आणि खेळाडूंना पाठिंबा देण्याचे कसब जाणतो. संजूने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना संघाला २०२२ च्या फायनलपर्यंत नेले होते. जर सूर्याने पद सोडण्याचा निर्णय घेतला, तर संजू ती पोकळी भरून काढू शकतो.’
संजू सॅमसनने नुकत्याच संपलेल्या विश्वचषकात ५ सामन्यांत २९९ धावा कुटल्या आहेत. विशेष म्हणजे, आगामी आयपीएल २०२६ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्स (CSK) या नवीन फ्रँचायझीकडून खेळताना दिसणार आहे. या हंगामातील त्याची कामगिरी त्याच्या कर्णधारपदाच्या दाव्यावर शिक्कामोर्तब करू शकते.
सूर्यासाठी आगामी काळ संघात स्थान टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. २०२५ मध्ये एकाही अर्धशतकाची नोंद त्याच्या नावावर नव्हती. विश्वचषकाच्या सुरुवातीला त्याने न्यूझीलंड आणि अमेरिकेविरुद्ध शानदार फलंदाजी केली असली, तरी उत्तरार्धात आणि विशेषतः अंतिम सामन्यात तो शून्यावर बाद झाला. संघ जिंकल्यामुळे त्याचे अपयश झाकले गेले असले, तरी सातत्यपूर्ण कामगिरीशिवाय कर्णधारपद टिकवून ठेवणे त्याच्यासाठी कठीण जाऊ शकते.