नवी दिल्ली : भारताचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार सचिन तेंडुलकर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) पुढील अध्यक्ष बनण्याच्या चर्चा निराधार असल्याचे त्याच्या व्यवस्थापन संस्थेने गुरुवारी स्पष्ट केले.
रॉजर बिन्नी यांचा कार्यकाळ वयाच्या 70 वर्षांमुळे जुलैमध्ये संपुष्टात आल्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. तेंडुलकरच्या व्यवस्थापन संस्थेने यासंदर्भात एक निवेदन जारी केले.
निवेदनात म्हटलंय की, ‘आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, सचिन तेंडुलकर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी विचारात घेतले जात आहे किंवा त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे, अशा ज्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही. आम्ही सर्वांना विनंती करतो की, त्यांनी अशा निराधार चर्चांवर विश्वास ठेवू नये.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयची निवडणूक 28 सप्टेंबर रोजी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार आहे.