RCB Sale IPL: इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. ही फ्रँचायझी विक्रीच्या उंबरठ्यावर असून तिची बोली तब्बल 2 अब्ज डॉलरवर (सुमारे 16 हजार कोटी रुपये) जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या डील्सपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या शर्यतीत आता फक्त दोन मोठे दावेदार उरले आहेत आणि अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. एका बाजूला स्वीडनची प्रायव्हेट इक्विटी कंपनी EQT आहे, जिने सुमारे 2 अब्ज डॉलरची (18,518 कोटी) बोली लावल्याची चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूला रंजन पाई, कोहलबर्ग क्राविस रॉबर्ट्स अँड कंपनी (KKR) आणि टेमासेक यांचा समावेश आहे. या दोन गटांमध्ये आता थेट स्पर्धा रंगली आहे.
या डीलमध्ये सुरुवातीला अनेक मोठ्या नावांची चर्चा होती. मँचेस्टर युनायटेडचे मालक ग्लेझर कुटुंब आणि उद्योगपती अदार पूनावाला यांनीही सुरुवातीला रस दाखवला होता. मात्र नंतर त्यांनी या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे आता स्पर्धा थेट आणि निर्णायक झाली आहे.
RCB चे सध्याचे मालक डियाजियो यांनी ही डील पूर्ण करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची डेडलाइन ठरवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ही डील पूर्ण झाल्यास आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला जाऊ शकतो.
दरम्यान, केवळ RCB नव्हे तर राजस्थान रॉयल्स या संघाबाबतही हालचाली वाढल्या आहेत. या फ्रँचायझीत हिस्सेदारी घेण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्यांनी रस दाखवला आहे. आदित्य बिर्ला समूह या शर्यतीत आघाडीवर असल्याचं मानलं जात आहे. याशिवाय अमेरिकन गुंतवणूकदार डेविड ब्लिट्झर यांचं नावही चर्चेत आहे. राजस्थान रॉयल्ससाठी 1.1 ते 1.35 अब्ज डॉलरपर्यंत बोली लागू शकते, अशी माहिती समोर येत आहे.
या सर्व घडामोडींमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू सातत्याने वाढत आहे. जगभरातील गुंतवणूकदार आता या लीगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे आयपीएल हा केवळ क्रिकेटचा खेळ न राहता एक मोठा बिझनेस झाला आहे. आता सर्वांच्या नजरा RCB चा नवा मालक कोण असणार याकडे लागल्या आहेत.