स्पोर्ट्स

Ravi Shastri : डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारत-ऑस्ट्रेलियातील मोठी मैदाने योग्य! रवी शास्त्रींनी ICCला सुचवले दोन पर्याय

WTC Final : असे ठिकाण निवडायला हवे जिथे तुम्ही प्रचंड गर्दी आकर्षित करू शकता. कारण लॉर्ड्स हे एक लाख आसनक्षमतेचे स्टेडियम नाही.

रणजित गायकवाड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे (WTC) आतापर्यंत तीन हंगाम खेळले गेले आहेत आणि या तिन्ही हंगामांचे अंतिम सामने इंग्लंडमध्येच पार पडले आहेत. दरम्यान, भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) एक महत्त्वपूर्ण सूचना केली आहे.

त्यांच्या मते, जेव्हा WTC जागतिक स्तरावर अधिक लोकप्रिय होईल, तेव्हा या स्पर्धेचे आयोजन भारत आणि ऑस्ट्रेलियातील मोठ्या स्टेडियममध्ये केले जाऊ शकते. यासाठी त्यांनी दोन विशिष्ट स्टेडियमची नावेही सुचवली आहेत, जिथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो.

WTC अंतिम सामन्याच्या ठिकाणाबद्दल काय म्हणाले शास्त्री?

रवी शास्त्री यांनी विस्डेन क्रिकेट पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले की, ‘मला वाटते की सुरुवातीच्या काळात हा सामना लॉर्ड्सवर झाल्यास चांगले आहे. एकदा का या स्पर्धेला त्या स्तरावरील लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली, ज्याची ती हक्कदार आहे, तेव्हा तिचे आयोजन दुसऱ्या देशात करण्यास सुरुवात करता येईल. मला वाटते की ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी एक उत्तम ठिकाण ठरू शकते. तसेच, अहमदाबादमधील स्टेडियम देखील WTC फायनलसाठी एक उत्कृष्ट पर्याय असू शकते.’

ते पुढे म्हणाले की, ‘मूलतः, असे ठिकाण निवडायला हवे जिथे तुम्ही प्रचंड गर्दी आकर्षित करू शकता. कारण लॉर्ड्स हे एक लाख आसनक्षमतेचे स्टेडियम नाही. त्यामुळे कोणताही संघ खेळत असला तरी, तुम्हाला चांगली गर्दी मिळेल याची खात्री असते. अशा परिस्थितीत, अंतिम सामन्याचे आयोजन मोठ्या स्टेडियममध्ये करायला हवे.’

WTC 2025 चा अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला गेला होता

पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथम्प्टनच्या रोझ बाऊल येथे खेळवण्यात आला होता, ज्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. त्यानंतर दुसरा WTC अंतिम सामना ओव्हलवर खेळवण्यात आला, जिथे ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून विजेतेपद पटकावले. नुकतेच तिसऱ्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने लॉर्ड्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला धूळ चारली.

विशेष म्हणजे, 2031 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापर्यंतचे यजमानपद इंग्लंडकडे आहे. त्यामुळे, 2031 नंतरच WTC चा अंतिम सामना इतर कोणत्याही देशात आयोजित केला जाऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT