

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana ) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. ६२ चेंडूंत नाबाद ११२ धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर मंधाना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिच्या या दमदार खेळीमुळे भारताने इंग्लंडवर ९७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
कर्णधार हरमनप्रीत कौर सराव सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकली नाही. तिच्या अनुपस्थितीत स्मृतीने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृतीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत इंग्लिश गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. तिने आपल्या खेळीत १५ चौकार आणि तीन षटकार लगावले. तिच्या या खेळीमुळे भारताने २० षटकांत ५ गडी गमावत २१० धावा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १४.५ षटकांत केवळ ११३ धावांवर सर्वबाद झाला.
या शतकासह मंधानाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. तिने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात १०६ धावांची खेळी केली होती. २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच कसोटी सामन्यात १२७ धावा केल्या होत्या. आता टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातही शतक झळकावून तिने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतक करण्याचा पराक्रम केला आहे. जागतिक महिला क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी ती केवळ पाचवी फलंदाज आहे. यापूर्वी बेथ मूनी, लॉरा वोलवार्ड्ट, हीदर नाइट आणि टॅमी ब्यूमोंट यांनी हा विक्रम केला आहे.
या कामगिरीमुळे स्मृती मंधानाने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज भारतीय पुरुष क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. पुरुष आणि महिला क्रिकेट मिळून आतापर्यंत केवळ सहा भारतीय फलंदाजांनी तिन्ही प्रकारांत शतके झळकावली आहेत. या यादीत सुरेश रैना, विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल आणि शुभमन गिल यांच्यानंतर आता स्मृती मानधनाच्या नावाचाही समावेश झाला आहे.
स्मृती मानधना महिला टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. हरमनप्रीत कौरनंतर क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकारात शतक करण्याचा मान तिने मिळवला. याशिवाय, स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी सलामीला ७७ धावांची भागीदारी केली. या दोघींची सलामी जोडी म्हणून ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्याची ही २१ वी वेळ होती. या बाबतीत त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली आणि बेथ मूनी (२० वेळा) यांना मागे टाकत एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.