पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल)मध्ये पुनरागमन केले आहे. राजस्थान रॉयल्सने राहूल द्रविड यांना संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी दिली आहे. 'पीटीआय'ने दिलेल्या माहितीनुसार राहूल द्रविड आयपीएल 2025 प्रशिक्षक म्हणून दिसणार आहेत. द्रविड यांच्या मुख्य प्रशिक्षक कार्यकाळातच भारताने यावर्षी टी-20 विश्वचषक जिंकला होता.
भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांचे राजस्थान रॉयल्सशी जुने नाते आहे. त्यांनी आयपीएलमध्ये राजस्थानचे नेतृत्वही केले आहे. यासह 2012 आणि 2013 च्या हंगमात राजस्थानच्या संघात ते होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी 2014 आणि 2015 या वर्षांत राजस्थान संघामध्ये मार्गदर्शकपदाची धुरा सांभाळली होती. 2016 च्या हंगामात ते दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात सहभागी झाले होते.
2019 साली राहुल द्रविड यांना बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदाची जबाबदारी मिळाली. 2021 मध्ये त्यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. तीन वर्षांच्या कार्यकाळात द्रविड यांनी भारतीय संघाने WTC 2021 आणि 2023, ODI विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत धडक मारली हाेती. 29 जून 2024 रोजी त्याच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप पटकावला हाेता.
'क्रिकइन्फो'च्या रिपाेर्टनुसार, राजस्थान रॉयल्स माजी भारतीय फलंदाज विक्रम राठोड यांना सहाय्यक प्रशिक्षक बनवू शकते. राठाेड हे भारताचे माजी निवड समितीचे सदस्य आणि 2019 मध्ये भारताचे फलंदाजी प्रशिक्षक होण्यापूर्वी ते NCA मधील द्रविड यांच्या कोचिंग स्टाफचा भाग होते.
2008 साली झालेल्या आयपीएल पहिले जेतेपद शेन वॉर्न नेतृत्वात राजस्थानने पटकावले होते. तेव्हापासून स्पर्धेचे जेतेपद राजस्थानला हुलकावणी देत आहे. 2022 साली झालेल्या हंगामात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानने अंतिम सामन्यात धडक मारली होती.परंतु, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातने राजस्थानचा सात विकेटनी पराभूव केला होता. 2023 मध्ये, राजस्थान संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही. हंगामात चांगली सुरुवात करूनही, संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर होता. 2024 मध्ये राजस्थान संघ क्वालिफायर 2 मध्ये बाहेर पडला होता.