

पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Points Table : बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. मंगळवारी (दि. 3) रावळपिंडी कसोटी सामन्यात 6 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. बांगलादेशने पाकिस्तानला कसोटी मालिकेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मधील बांगलादेशचा हा तिसरा विजय असून पाकिस्तानचा 5वा पराभव आहे.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 274 धावा केल्या. प्रत्युत्तरात लिटन दासच्या शतकाच्या (138) बळावर बांगलादेशने 262 धावा केल्या. पहिल्या डावाच्या जोरावर 12 धावांची आघाडी असलेला यजमान पाकचा संघ दुसऱ्या डावात 172 धावांत गारद झाला. बांगलादेशकडून हसन महमूदने 5 आणि नाहिद राणाने 4 बळी घेतले. झाकीर हसनच्या (40) खेळीच्या बळावर बांगलादेशने विजयासाठी 185 धावांचे लक्ष्य गाठले आणि ऐतिहासिक मालिका विजय नोंदवला.
बांगलादेश संघाची विजयाची टक्केवारी 45.83 टक्के झाली आहे. यासह ते WTC गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या मोसमात बांगलादेशने 3 सामने जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. दरम्यान, पाकिस्तानवर विजय मिळवून बांगलादेशने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघांना मागे टाकले आहे. इंग्लिश संघाची विजयाची टक्केवारी 45 असून ते 5व्या स्थानावर आहेत. तर प्रोटीज संघ 38.89 विजयी टक्केवारीस सहाव्या स्थानावर आहे. श्रीलंका संघाची विजयाची टक्केवारी 33.33 आहे. हा संघ सातव्या स्थानावर आहे.
WTC 2023-25 मध्ये पाकिस्तानने फक्त 2 कसोटी सामने जिंकले आहेत, तर 5 गमावले आहेत. शान मसूदच्या नेतृत्वाखालील हा संघ 19.05 विजयी टक्केवारीस गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या खाली, वेस्ट इंडिज आहे. कॅरिबियन संघाने WTC 2023-25 मध्ये एकूण 9 कसोटी खेळल्या आहेत. त्यातील 1 जिंकली असून 6 गमावल्या आहेत.
टीम इंडियाने सध्या WTC 2023-25 मध्ये एकूण 9 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 6 जिंकले आहेत. अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी 68.51 आहेत. दुस-या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा तर तिस-या स्थानावर न्यूझीलंड आहे. या दोन्ही संघांची विजयाची टक्केवारी अनुक्रमे 62.50 आणि 50 आहे.