पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमल याने PCB) प्रमुख मोहसीन नक्वीसह संघावर चौफेर टीका केली.  Pudhari Photo
स्पोर्ट्स

Paki vs Ban| "आता काय ICC ट्रॉफी चोरणार का?" : बांगलादेशने लोळवल्‍यानंतर माजी क्रिकेटपटूने नक्‍वींसह पाकिस्तान संघाला झापले

Pakistan vs Bangladesh | टी-२० विश्‍वचषकातील नामुष्‍कीजनक पराभवानंतर पाकिस्‍तानने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकाही गमावली

पुढारी वृत्तसेवा

Pakistan vs Bangladesh

इस्‍लामाबाद : पाकिस्‍तान संघाने टी-२० विश्‍वचषकातील नामुष्‍कीजनक कामगिरीची मालिका कायम ठेवली आहे. रविवारी (दि. १५ मार्च) बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही संघाने गमावली आहे. खेळाडूंच्या सुमार कामगिरीवर पाकिस्तानचा माजी स्टार खेळाडू आणि माजी निवडकर्ता कामरान अकमल याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख मोहसीन नक्वी यांच्यासह संघावर हल्लाबोल केला आहे.

आता नेदरलँड्सलाही वाटेल की पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळावी...

बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर संतप्त झालेल्या कामरान अकमल एका चर्चेदरम्यान म्हणाला की, "सध्याची परिस्थिती अशी आहे की, आता नेदरलँड्सलाही वाटेल की आपण पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळावी, त्यांना हरवावे आणि कसोटी दर्जा मिळवावा. ही आज पाकिस्तान क्रिकेटची अवस्था झाली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेश सहज ३५० धावा करू शकला असता; पण त्यांनी २९० धावांपर्यंत मजल मारली. लिटन दास संथ खेळला, तरीही आपण हरलो."

आयसीसीच्या ट्रॉफी चोरून घरी आणणार का?

अकमलने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख मोहसीन नक्वी यांच्यावरही कडाडून टीका केली. २०२५ च्या आशिया चषक स्पर्धेनंतर विजेत्या भारताने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर नक्वींनी ती स्वतःकडेच ठेवून घेतल्याचा आरोप आहे. अकमल म्हणाला, "जर तुम्ही मैदानात संघांना हरवू शकत नसाल, तर आता काय आयसीसीच्या ट्रॉफी चोरून घरी आणणार का?", असा संतप्त सवालही त्याने केला आहे.

सामन्यात काय घडलं?

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा सलामीवीर तन्झीद हसन याने १०७ धावांची शानदार खेळी केली. यामुळे संघाला २९० धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. तास्किन अहमद आणि नाहिद राणा यांच्या वेगवान माऱ्यासमोर पाकिस्तानची अवस्था ३ बाद १७ अशी झाली होती. सलमान अली आगाने (१०६) आणि साद मसूद (३८) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या.

डीआरएस (DRS) वादाने गाजले शेवटचे षटक

शेवटच्या षटकात पाकिस्तानला १४ धावांची गरज असताना शाहीन आफ्रिदी यष्टीचित झाला. बांगलादेशने ११ वर्षांनंतर पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजय साजरा केला. मात्र शेवटच्या षटकात एका डीआरएस निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानने याप्रकरणी मॅच रेफरीकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

नेमका वाद काय?

पाकिस्तानच्या मते, मैदानावरील अंपायर कुमार धर्मसेना यांनी बांगलादेशला 'रिव्ह्यू' घेण्यासाठी परवानगी दिली, जेव्हा १५ सेकंदांची वेळ संपली होती. स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनवर रिप्ले पाहिल्यानंतर बांगलादेशने रिव्ह्यू घेतल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे, जे नियमांच्या विरुद्ध आहे. शेवटच्या षटकात एका 'वाईड' चेंडूवर बांगलादेशने एलबीडब्ल्यूसाठी रिव्ह्यू घेतला. अल्ट्रा-एजमध्ये चेंडू बॅटला लागल्याचे दिसल्याने तो 'वाईड'चा निर्णय बदलला गेला, ज्यामुळे पाकिस्तानच्या विजयाच्या आशा मावळल्या. पाकिस्तानचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी मॅच रेफरी नियमूर रशीद यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, या तक्रारीमुळे निकालात कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT