

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२६ मधील अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कठोर पावले उचलली आहेत. ११ मार्चपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी स्टार फलंदाज बाबर आझम याला संघातून वगळण्यात आले आहे. बाबरने २०२५ मध्ये १७ एकदिवसीय सामन्यांत ७७.१६ च्या स्ट्राइक रेटने ५४४ धावा केल्या होत्या. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत त्याने शतक झळकावले होते, परंतु सध्याचा सुमार फॉर्म पाहता निवडकर्त्यांना या माजी कर्णधाराला डच्चू देण्याचा निर्णय घ्यावा लागला.
टी-२० विश्वचषकातून पाकिस्तान बाहेर पडल्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी बाबरला संघातून हटवण्याची मागणी केली होती. यामध्ये शाहीद आफ्रिदीने तर निवडकर्त्यांना चक्क असा सल्ला दिला होता की, बाबरला किमान दोन वर्षे संघाच्या समीकरणातून बाहेर ठेवावे.
केवळ बाबरच नाही, तर पाकिस्तानने संघात अनेक मोठे बदल केले आहेत. गेल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या आणि आयसीसी (ICC) स्पर्धेत समाधानकारक कामगिरी करणाऱ्या फखर झमानलाही संघातून वगळण्यात आले आहे. संघ व्यवस्थापनाने त्याला बाहेरचा रस्ता दाखवून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नवा संघ तयार करण्याचे संकेत दिले आहेत.
संघातील इतर महत्त्वाच्या अनुपस्थित खेळाडूंमध्ये सैम अयुब आणि नसीम शाह यांचा समावेश आहे. बाबरप्रमाणेच सैम अयुब देखील फलंदाजीत आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला होता, ज्यामुळे त्याला विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यातूनही वगळण्यात आले होते. त्याच्या अनुपस्थितीत साहिबजादा फरहानला संधी देण्यात आली आहे. साहिबजादाने विश्वचषकात दोन शतके झळकावून खळबळ माजवली होती, तसेच विराट कोहलीचा एकाच टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडीत काढला होता.
दरम्यान, विश्वचषकातील पराभवानंतर शाहीन शाह आफ्रिदीला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी होत असतानाही, त्याच्याकडेच नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे. संघात स्थिरता राखण्यासाठी त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तसेच, विश्वचषक संघाचा भाग नसलेल्या मोहम्मद रिझवानचेही संघात पुनरागमन झाले आहे. विशेष म्हणजे, बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानने सहा नवोदित खेळाडूंना संधी देऊन आपली 'बेंच स्ट्रेंथ' आजमवण्याचा निर्णय घेतला आहे.