नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी तणावपूर्ण झाले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) यांच्या आगामी स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
पुरुष आशिया कप स्पर्धेचे यंदाचे यजमानपद BCCI कडे आहे. त्यामुळे ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे. ‘क्रिकबझ’ने दिलेल्या माहितीनुसार, ही स्पर्धा तटस्थ देशात होणार असून सप्टेंबरमध्ये दुबईत किंवा श्रीलंकेत आयोजित केली जाईल अशी चर्चा आहे. मात्र स्पर्धेच्या ठिकाणापेक्षा या त्यातील गटवाटपाचा मुद्दा अधिक महत्त्वाचा बनला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आशिया कपसाठी 170 दशलक्ष डॉलर किमतीचे मीडिया हक्क विकले आहेत. स्पर्धेत किमान दोन भारत-पाकिस्तान सामने होतील, आणि जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले, तर तिसरा सामना होऊ शकतो, अशा अनौपचारिक समजुतीच्या आधारे हा करार झाला असल्याचे समजते.
2023 मध्ये झालेली आशिया कप स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळाण्यात आली होती. ज्यात भारत आणि पाकिस्तान एकाच गटात होते. त्या स्पर्धेत उभय संघांमध्ये दोन सामने झाले. पहिला गट सामना भारताने जिंकला तर सुपर फोरमधील सामना पावसामुळे रद्द झाला. ज्यामुळे पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून चषक उंचावला.
यंदाच्या आशिया कप स्पर्धेचे ठिकाण अद्याप घोषित झालेले नाही, पण रिपोर्टनुसार ड्रॉ मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता तो पुढे ढकलला जाऊ शकतो. अंतिम निर्णय भारत-पाकिस्तानमधील तणावाची तीव्रता वाढते की कमी होते, यावर अवलंबून असेल.
महिला वनडे विश्वचषक स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारतात होणार आहे. पाकिस्तानने या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या स्पर्धेत गट नसतील, कारण सर्व संघांच्या एकमेकांविरुद्ध राउंड-रॉबिन स्वरूपात लढती होणार आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांचा सामना रंगणार आहे. आयसीसीने 2024-2027 साठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे हा सामना भारताबाहेर खेळला जाऊ शकतो.
भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेतही भारत-पाकिस्तान सामना श्रीलंकेत खेळवला जाईल.
पहलगाम हल्ल्यांनंतर, भारत आणि पाकिस्तान यांना भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकाच गटात ठेवू नये अशी विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) केली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या संदर्भात BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे की बोर्ड सरकारच्या सूचनेनुसारच निर्णय घेईल. एका वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्यानेही असे वृत्त फेटाळले आहे. बीसीसीआय राष्ट्रीय भावनांप्रती संवेदनशील आहे, परंतु सध्या अशी कोणतीही मागणी केलेली नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे 2012-13 नंतर द्विपक्षीय क्रिकेट सामने झालेले नाहीत. आयसीसी आणि एसीसी स्पर्धांमध्येच हे दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. आयसीसीने 2024-2027 साठी तटस्थ ठिकाणांचा नियम लागू केल्याने, भारत-पाकिस्तान सामने UAE, श्रीलंका किंवा अन्य तटस्थ ठिकाणी होण्याची शक्यता आहे. तथापि, भारतात होणाऱ्या स्पर्धांसाठी भारत सरकारच्या परवानगीवर बीसीसीआयचा निर्णय अवलंबून असेल.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांभोवती नेहमीच तणाव आणि उत्साहाचे वातावरण असते. आयसीसी आणि एसीसी स्पर्धांमध्ये हे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जाण्याची शक्यता आहे, परंतु अंतिम निर्णय सरकारच्या मार्गदर्शनावर आणि परिस्थितीवर अवलंबून असेल.