

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात होणाऱ्या 2025 च्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व 8 संघांची निवड झाली आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेच्या महिला संघांनी या स्पर्धेसाठी यापूर्वीच पात्रता मिळवली आहे. पण वेस्ट इंडिज संघाने थायलंडविरुद्धचा सामना जिंकूनही त्यांचे फक्त 0.013 च्या नेट रन रेटने विश्वचषक खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. ज्यामुळे स्पर्धेतील संघांच्या यादीत बांगलादेशने आठवे स्थान मिळवले आहे.
भारतात यावर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेसाठी पहिला सहा संघ पात्र झाले होते. दोन संघासाठी आयसीसीने सहा संघांमध्ये पात्रता फेरी खेळवली. या पात्रता फेरीचे सामने नुकतेच पाकिस्तानमध्ये खेळवण्यात आले. ज्यात पाकिस्तानने सलग पाच सामने जिंकून विश्वचषक स्पर्धेतील स्थान पक्के केले. आठव्या संघासाठी वेस्ट इंडिज, बांगला देश यांच्यात चुरस रंगली होती. दोन्ही संघांनी 3-3 सामने जिंकले, पण नेट रन रेटमध्ये अटीतटीची लढत होती. यात वेस्ट इंडीज मागे होता.
शनिवारी (दि. 19) पात्रता फेरीचा शेवटच्या सामना पार पडला. ज्यात विंडिज महिला संघासमोर आणि थायलंडचे आव्हान होते. थायलंड प्रथम फलंदाजी करताना विंडिजला 167 धावांचे लक्ष्य दिले, जे त्यांनी 10.5 षटकात 168 धावा करून पार केले. पण विश्वचषकासाठी पात्र होण्यासाठी कॅरेबियन संघाला विजयी लक्ष्य 10.1 षटकात गाठायचे होते, पण त्यांनी 4 चेंडू जास्त खेळले. यामुळे त्यांचा नेट रनरेट बांगला देश संघापेक्षा फक्त 0.013ने कमी राहिला. बांगलादेशचा नेट रन रेट 0.639 तर वेस्ट इंडीजचा नेट रन रेट 0.626 राहिला. परिणामी केवळ 4 चेंडूंच्या फरकाने विंडिजचा संघ भारतातील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आता खेळताना दिसणार नाही.
वेस्ट इंडीजची कर्णधार हेली मॅथ्यूजने फक्त 29 चेंडूंमध्ये झंझावाती 70 धावा फटकावल्या, तर चिनली हेन्रीने 17 चेंडूंमध्ये 48 धावा केल्या. हा एक ऐतिहासिक विजय ठरला. पण विश्वचषक स्पर्धेत संघाला पात्रता मिळवून देण्यात त्या अपयशी ठरल्या. या स्वप्नभंगानंतर वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेटपटूंना अश्रू अनावर झाले. सर्व खेळाडूंना मैदानातच रडू कोसळले. हे दृश्य पाहून क्रिकेट समिक्षकांसह चाहतेही स्तब्ध झाले.
महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन भारतात 29 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. 8 संघांमध्ये एकूण 31 सामने खेळवले जातील. वर्ल्ड कपचे सामने मुल्लांपूर (मोहाली), इंदूर, रायपूर, तिरुवनंतपुरम आणि विशाखापट्टणम येथे खेळवले जातील.