

Pahalgam Terror Attack : Pakistani Hindu cricketer Danish Kaneria slams PM Shahbaz Sharif
लाहोर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानचा माजी लेग-स्पिनर दानिश कनेरिया संतापला आहे. या संपूर्ण प्रकरणात मौन बाळगल्याबद्दल त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘सत्य माहित आहे पण तरीही ते दहशतवादाविरुद्ध काहीही बोलत नाहीत आणि उलट ते त्याला प्रोत्साहन देत आहेत,’ असा आरोप कनेरियाने शरीफ यांच्यावर केला आहे.
दानिश कनेरिया म्हणाला की, ‘पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांचे मौन बरेच काही सांगते आणि हे स्पष्ट संकेत आहे की पाकिस्तानमध्ये दहशतवादाला संरक्षण मिळत आहे.’ पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर कनेरिया अत्यंत संतापला आहे. या मुद्द्यावर त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एकापाठोपाठ अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत.
दानिशने त्याच्या पोस्टमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना टॅग केले आहे. तो म्हणतो, ‘जर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा खरोखरच काही सहभाग नाही, तर पंतप्रधान @CMShehbaz (शहबाज शरीफ) यांनी अद्याप य घटनेचा निषेध का केला नाही? तुम्ही पाकिस्तानच्या सैन्याला अचानक हाय अलर्ट राहण्याचे का आदेश दिले? कारण तुम्हाला सत्य माहित आहे, तुम्ही दहशतवाद्यांना आश्रय देत आहात आणि प्रोत्साहन देत आहात, तुम्हाला लाज वाटली पाहिजे.’
कनेरियाने दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटंलय की, ‘दहशतवादी हल्ले कधीच काश्मिरी मुस्लिमांना लक्ष्य का करत नाहीत? प्रत्येक वेळी हिंदूंवर हल्ले का होतात? मग ते काश्मिरी पंडित असोत की भारताच्या वेगवेगळ्या भागातून येणारे हिंदू पर्यटक असोत? कारण दहशतवाद, तो कसाही दाखवला गेला तरी, तो एकाच विचारसरणीने प्रेरित आहे आणि आज संपूर्ण जगाला त्याची किंमत चुकवावी लागत आहे.’
‘मी एकदा अभिमानाने पाकिस्तानची जर्सी परिधान केली होती. राष्ट्रीय संघासाठी मैदानावर रक्त आणि घाम सांडले. पण शेवटी, पहलगाम हल्ल्यातील बळींसोबत जे घडले तेच माझ्यासोबतही घडले; मी हिंदू आहे म्हणूनच मला लक्ष्य करण्यात आले. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. दहशतवाद्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही लाज वाटली पाहिजे. मी सत्याच्या बाजूने आहे. मी मानवतेसोबत आहे आणि मला खात्री आहे की पाकिस्तानच्या लोकांनाही तेच हवे आहे, त्यांची दिशाभूल करू नका, वाईटाचे समर्थन करू नका,’ असा टोला लगावला आहे.