आशिया चषक (U-19 Asia Cup) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून भारताला विजेतेपद मिळवून देणाऱ्या मोहित उल्वाला मोठे बक्षीस मिळाले आहे. File Photo
स्पोर्ट्स

Mohit Ulva U-19 Asia Cup : शेवटच्‍या चेंडूवर पाकिस्‍तानला पाकिस्तानला धूळ चारणार्‍या मोहित उल्‍वाला मिळाले मोठे बक्षीस

Mohit Ulva U-19 Asia Cup : मोहित उल्‍वाने भारतीय संघाला मिळवून दिला अविस्मरणीय विजय

पुढारी वृत्तसेवा

Mohit Ulva Syed Mushtaq Ali Trophy : १९ वर्षांखालील आशिया चषक (U-19 Asia Cup) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून भारताला विजेतेपद मिळवून देणाऱ्या मोहित उल्वाला या कामगिरीचे मोठे बक्षीस मिळाले आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (SCA) त्याला आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी (SMAT) आपल्या वरिष्ठ (सीनियर) संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या १८ वर्षांचा मोहित आता लवकरच इंदूर येथे सौराष्ट्रच्या मुख्य संघात दाखल होणार आहे.

मोहित उल्‍वाने भारतीय संघाला मिळवून दिला अविस्‍मरणीय विजय

पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर चौकार खेचत भारताला अविस्मरणीय विजय मिळवून देणाऱ्या मोहितच्या या दमदार खेळीची दखल घेण्यात आली आहे. या १८ वर्षीय युवा फलंदाजाला आता वरिष्ठ क्रिकेटमध्ये आपली चमक दाखवण्याची मोठी संधी मिळणार आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शाह यांनी या निवडीला दुजोरा दिला असून, मोहितला थेट इंदूरला पोहोचून संघाशी जोडले जाण्यास सांगण्यात आले आहे. सौराष्ट्रचा संघ सध्या इंदूरमध्ये या स्पर्धेचे सामने खेळत आहे.

मोहितची झुंजार वृत्ती खरंच कौतुकास्‍पद : जयदेव शाह

या निवडीबाबत 'क्रिकबज'शी बोलताना जयदेव शाह म्हणाले की, "मोहितने मैदानावर दाखवलेली जिद्द आणि झुंजार वृत्ती खरंच कौतुकास्पद आहे. त्यामुळेच एससीएने त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या संघात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्याला तात्काळ इंदूरला जाऊन सौराष्ट्र संघासोबत सराव सुरू करण्यास सांगितले आहे.

एका सर्वसामान्‍य कुटुंबातील मोहित

मोहित हा अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. राजकोटजवळील सुरेंद्रनगर येथील एका सर्वसामान्य कुटुंबातून तो पुढे आला असून सध्या राजकोटमध्येच राहतो. युवा खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न असतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत तो संघासाठी नक्कीच एक चांगला खेळाडू ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे, असेही जयदेव शाह यांनी स्‍पष्‍ट केले.

शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला केले होते चॅम्पियन

शनिवारी सायंकाळी ओमानमध्ये पार पडलेल्या १९ वर्षांखालील आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात मोहित उल्वाने प्रचंड दडपणाखाली पाकिस्तानविरुद्ध संयमी खेळी केली. विजयासाठी शेवटच्या चेंडूवर धावांची गरज असताना त्याने खणखणीत चौकार लगावत भारताला १ गडी राखून थरारक विजय मिळवून दिला. भारताच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयी फटक्यानंतर भारतीय गोटात एकच जल्लोष सुरू झाला.मैदानाबाहेर उपस्थित असलेल्या भारतीय चाहत्यांनीही या विजयाचा जोरदार आनंद साजरा केला. विशेष म्हणजे, मस्कतच्या बाहेरील ओमान क्रिकेट अकादमीच्या मैदानावर भारतीय समर्थकांच्या तुलनेत पाकिस्तानी चाहत्यांची संख्या जास्त होती, अशी माहिती ओमान क्रिकेटच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. अशा तणावपूर्ण आणि विरोधी वातावरणात मोहितने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या चौकाराने भारतीय चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT