

Asia Cup controversy
नवी दिल्ली : यावर्षी टी-20 आशिया चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताने दिमाखदार विजय मिळवला होता. तसेच पुलवामा दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष आणि गृहमंत्री असणाऱ्या मोहसीन नक्वीकडून चषक स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर निल्लर्जपणाचा कळस गाठत विजेत्यांचा सन्मान करण्याऐवजी नक्वीने ट्रॉफी ‘पळवून’ नेली. ती ट्रॉफी दुबईतील एसीसी (ACC) कार्यालयात लॉक करून ठेवली. आता हाच नक्वी पुन्हा एकदा भारताच्या १९ वर्षांखालील संघाविरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) औपचारिक तक्रार दाखल करणार आहे.
रविवारी १९ वर्षांखालील पुरुष आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ८ बाद ३४७ धावांचा डोंगर उभा केला. समीर मिन्हासने शतक झळकावले. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय संघाचा डाव अवघ्या २६.२ षटकांत १५६ धावांत गुंडाळला. पाकिस्तानच्या संघाने १९१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये अनेकदा शाब्दिक चकमक आणि तणावाचे प्रसंग पाहायला मिळाले.
विजेत्या संघासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोहसीन नक्वी याने भारतीय खेळाडूंवर गंभीर आरोप केले. तो म्हणाला, "अंतिम सामन्यादरम्यान भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंना सतत चिथावणी देत होते. भारतीय खेळाडूंनी मर्यादा ओलांडली असून, आम्ही या घटनेबाबत आयसीसीला अधिकृतपणे कळवणार आहोत. राजकारण आणि खेळ नेहमीच वेगळे ठेवले पाहिजेत."
पाकिस्तान अंडर-१९ संघाचा मार्गदर्शक (Mentor) सरफराज अहमद यानेही भारतीय खेळाडूंच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, "मैदानावर भारतीय खेळाडूंचे वर्तन योग्य नव्हते, ते क्रिकेटच्या खिलाडूवृत्तीला धरून नव्हते. असे असूनही आम्ही आमचा विजय संयमाने साजरा केला. क्रिकेट नेहमी योग्य भावनेने खेळले पाहिजे."